भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका गुरुवारी (२९ जुलै) संपली. श्रीलंकेने ही मालिका २-१ ने जिंकली. भारताच्या युवा संघाकडून या मालिकेत भरपूर अपेक्षा होत्या. कारण, या मालिकेतील कामगिरीच्या आधारावर खेळाडूंना टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान निश्चित करण्याची संधी होती. संजू सॅमसन व मनिष पांडे यांसारख्या अनुभवी खेळाडूंना ही संधी साधता आली नाही. मात्र, तीन युवा खेळाडूंनी या दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी करत टी२० विश्वचषकासाठी आपली दावेदारी ठोकली.
टी२० विश्वचषकाचे आयोजन १७ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात ओमान व संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी निवड अपेक्षित असलेल्या तीन खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊया
पृथ्वी शॉ-
श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्याच सामन्यात आपल्या तुफानी फलंदाजीने युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पृथ्वीने तीन वनडे सामन्यात १०६ धावा फटकावल्या. तो तिन्ही सामन्यात संघाला वेगवान सुरुवात देण्यात यशस्वी ठरला. तो दौऱ्यावर एकमेव टी२० सामना खेळला व त्याला खातेदेखील खोलता आले नाही. मात्र, त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला विश्वचषकासाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
राहुल चाहर-
श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासाठी सर्वाधिक प्रभावी कामगिरी युवा लेगस्पिनर राहुल चाहरने केली. त्याला दौऱ्यावर एकच वनडे सामना खेळण्यासाठी मिळाला. त्याने या सामन्यात तीन बळी आपल्या नावे केले. तर, टी२० मालिकेतील दोन सामने खेळताना त्याने चार श्रीलंकन खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या किफायतशीर व अचूक गोलंदाजीचे उत्तर कोणत्याही श्रीलंकन फलंदाजांकडे नव्हते.
दीपक चाहर-
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान गोलंदाजांची निवड होणे जवळपास नक्की आहे. मात्र, चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी मोठी स्पर्धा दिसून येते. श्रीलंका दौऱ्यावर केवळ गोलंदाजीच नव्हेतर, फलंदाजीतही शानदार कामगिरी करत वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सर्वांचे लक्ष वेधले. दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ६८ धावांची नाबाद खेळी करत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. युएई येथील खेळपट्ट्या पाहता त्याची स्विंग गोलंदाजी भारतासाठी उपयोगी ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
सुवर्णपदक विसरा! सेमीफायनलमध्ये सिंधू सरळ सेटमध्ये पराभूत; आता लक्ष्य कांस्य पदक
जागतिक अव्वल क्रमांकाच्या बॉक्सरकडून पूजा राणीचा एकतर्फी पराभव; ऑलिंपिक्स २०२०मधून पडली बाहेर
‘तर भारतात एन्ट्री देणार नाही, बीसीसीयकडून मिळाली धमकी’, हर्षल गिब्सचा गंभीर आरोप