वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएल 2021 मधून माघार घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, आर्चरची कोपर शस्त्रक्रिया होणार आहे. अर्थातच तो 2-3 महिने क्रिकेटपासून दूर राहणार असून अशा परिस्थितीत जोफ्रा आर्चरचे मैदानाबाहेर राहणे राजस्थान रॉयल्ससाठी खूप मोठा धक्का आहे.
तर आज आम्ही तुम्हाला 3 वेगवान गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना राजस्थान रॉयल्स संघात जोफ्रा आर्चरच्या जागी स्थान दिले जाऊ शकते.
1. मॅट हेन्री
मॅट हेन्रीने नुकतीच बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली, त्यामध्ये त्याने 3 सामन्यांत 6 बळी घेतले आहेत. या खेळाडूने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 2 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 1 विकेट घेतली आहे. मॅट हेन्री आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मॅट हेन्रीची सध्याची खेळी पाहता राजस्थान रॉयल्सचा संघ त्याला आयपीएल 2021 मध्ये जोफ्रा आर्चरच्या जागी संघात समाविष्ट करू शकतो. हा वेगवान गोलंदाज अनुभवी असून त्याने 90 देशांतर्गत टी-20 सामन्यांच्या कारकीर्दीत एकूण 88 बळी घेतले आहेत. मॅट हेन्रीकडे 140 किमी प्रति तासाच्या वेगाने सतत गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारे, तो आर्चरच्या जागी एक चांगला पर्याय देखील ठरू शकतो.
2. शेल्डन कॉट्रेल
आयपीएल 2020 मध्ये शेल्डन कॉट्रेलने किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी एकूण 6 सामने खेळले होते. त्यामध्ये त्याने एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. पंजाब संघाने शेल्डन कॉट्रेलकडून ज्या प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा केली होती, तशी गोलंदाजी करण्यात तो अपयशी ठरला होता. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने शेल्डन कॉट्रेलला 8.5 कोटी किंमतीला विकत घेतले होते. 2021 च्या लिलावातही त्याने आपले नाव दिले होते, परंतु त्याला कोणत्याही संघाने घेतले नाही. परंतु, याक्षणी परदेशी वेगवान गोलंदाजांचे चांगले पर्याय असल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्समध्ये जोफ्रा आर्चरच्या जागी शेल्डन कॉट्रेलचा संघात समावेश होऊ शकतो.
3.जेसन बेहरनडॉर्फ
जेसन बेहरनडॉर्फ हा ऑस्ट्रेलियाचा 30 वर्षीय वेगवान गोलंदाज आहे. आयपीएल 2018 च्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने 1.5 कोटीमध्ये विकत घेतले होते. परंतु दुखापतीमुळे तो आयपीएल 2018 मध्ये खेळला नाही. मात्र आयपीएल 2019 मध्ये त्याने 5 सामने खेळले, ज्यात त्याने 8.68 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 5 बळी घेतले. हा वेगवान गोलंदाज स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. बिग बॅश लीग 2020-21 च्या सत्रात त्याने आपल्या टीम पर्थ स्कॉर्चर्सकडून नवीन चेंडूने विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्स जोफ्रा आर्चरच्या जागी जेसन बेहरनडॉर्फला सुद्धा संघात समाविष्ट करण्याचा विचार करू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सला जेतेपद जिंकून देणारा ‘स्वप्निल असनोडकर’
आयपीएल २०२१ आधी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात सामील झाला दिग्गज खेळाडू; सांभाळणार ‘ही’ भूमीका
IPL 2021: चेन्नईसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला मुंबईत दाखल




