टीम इंडियातून (Team india) सध्या बाहेर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmed Shami) रणजी ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी करत पुन्हा टीममध्ये परत येण्याचा आपला दावा अधिक मजबूत केला आहे. शमीने दोन सामन्यांमध्ये एकूण 15 बळी घेत आपल्या फिटनेसचं आणि फॉर्मचं प्रत्यंतर दिलं आहे. त्याचबरोबर त्याने निवड समितीला (निवडकर्त्यांना) अप्रत्यक्षपणे उत्तरही दिलं आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर गुजरातविरुद्ध झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात शमीने एकूण 8 विकेट घेत बंगालला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. सामन्यानंतर त्याने टीम इंडियामध्ये स्वतःची निवड न झाल्याबद्दल सुरु असलेल्या वादावर मोठं वक्तव्य केलं.
मंगळवारी गुजरातविरुद्धच्या दुसऱ्या डावात शमीने 38 धावांत 5 बळी घेतले आणि आपल्या संघाला 141 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना जेव्हा त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड न केल्याबाबत आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या वक्तव्याबाबत विचारणा झाली, तेव्हा शमी म्हणाला, मला आधीच माहिती होतं की हा प्रश्न येणार. मी तर कायम कुठल्या ना कुठल्या वादात अडकलेलो असतोच. तुम्ही लोकांनी आधीच मला खलनायक बनवलं आहे. आता मी आणखी काय बोलू? आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट तोडून-मोडून दाखवली जाते. माझं काम म्हणजे चांगली कामगिरी करणं आणि भारतीय संघासाठी नेहमी तयार राहणं. मला जिथं संधी मिळेल, तिथं मी माझं सर्वोत्तम देईन. बाकी निर्णय निवडकर्त्यांचा आहे.
शमी पुढे म्हणाला,कठीण काळातून बाहेर येऊन पुन्हा चांगली कामगिरी करणं ही मोठी समाधानाची गोष्ट आहे. वर्ल्ड कपनंतरचा काळ खूप कठीण आणि वेदनादायक होता. पण मी रणजी ट्रॉफी, व्हाइट-बॉल क्रिकेट, आयपीएल आणि दुलीप ट्रॉफी खेळत राहिलो. आता माझी लय पुन्हा पूर्वीसारखी परतली आहे. मला स्पष्टपणे जाणवतंय की माझ्यात अजून खूप क्रिकेट बाकी आहे.
शमी 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलनंतर (अहमदाबाद) तब्बल एक वर्ष टीम इंडियाबाहेर होता. त्यानंतर त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीममध्ये निवड झाली होती. भारतासाठी त्याचा शेवटचा सामना 9 मार्च 2025 रोजी दुबईत न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये झाला होता. त्यानंतरपासून तो पुन्हा भारतीय संघात पुनरागमन होण्याची प्रतीक्षा करत आहे.






