अनेक महिन्यांपासून क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची वाट पाहत होते, ती आता अवघ्या एक दिवसावर आलीये. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यातील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. तसेच, भारतीय संघाविषयी बोलायचं झालं, तर भारत 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडेल. अशात क्रिकेटप्रेमींना आशा आहे की, भारत पहिल्या सामन्यातच धमाकेदार प्रदर्शन करत अभियानाची सुरुवात शानदार करेल.
मात्र, विजय मिळवणे संघासाठी सोपे नसेल. कारण, ऑस्ट्रेलियाने अलीकडेच पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास वाढला असेल. या सामन्यात भारतीय संघाचे सर्वच खेळाडू 100 टक्के योगदान देतील. मात्र, आज या लेखातून आपण अशा 3 फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, जे भारतीय संघासाठी विजय खेचून आणू शकतात.
रोहित शर्मा
यादीतील पहिलं नाव आहे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. रोहितने मागील काही मालिकांमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. जेव्हाही मोठ्या स्पर्धांचा विषय येतो, तेव्हा रोहितची बॅट नेहमीच तळपते. 2023 वर्षाबद्दल बोलायचं झालं, तर रोहितने 15 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 647 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 53.91 इतकी राहिली आहे. यावरून समजते की, रोहित सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे असे म्हटले जाऊ शकते की, रोहित संघाला विश्वचषकात चांगली सुरुवात करून देण्यासाठी सज्ज आहे.
विराट कोहली
भारतीय संघाच्या फलंदाजांची चर्चा असेल आणि त्यात विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव नसेल, असे कधीच होणार नाही. विराटला त्याच्या धावा करण्याच्या वेगामुळे ‘रनमशीन’ म्हटले जाते. जिथे विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांची गोष्ट असते, तिथे विराट आणखीच खतरनाक फलंदाज बनतो. वनडे विश्वचषकापूर्वी अनेक स्टार गोलंदाज म्हणाले आहेत की, विराटला बाद करण्यासाठी खास योजना आखण्याची गरज आहे. सन 2023मधील विराटचे आकडे पाहिले, तर त्याने 16 सामने खेळताना 55.63च्या सरासरीने 612 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतकांचाही समावेश आहे. अशात विराट विश्वचषकात भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो.
हार्दिक पंड्या
मर्यादित षटकांच्या क्रिकेटची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा अष्टपैलू हार्दिक पंड्या याची भूमिका वाढते. भारतीय संघाविषयी बोलायचं झालं, तर पंड्या सध्या सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे. मागील एक वर्षापासून तो आयपीएल संघासोबतच भारतीय संघासाठीही महत्त्वाच्या खेळी करण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने अनेक क्षणी भारताला विजय मिळवून दिला आहे. तो फलंदाजीसोबतच गोलंदाजीतूनही संघाला मजबूती देतो. त्याच्या 2023मधील फलंदाजीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 16 सामन्यात 34च्या सरासरीने 372 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षी वनडेत त्याने धावा कमी केल्या असल्या, तरीही त्याच्याकडे मोठ्या सामन्यांचा चांगला अनुभव आहे. हा अनुभवच भारतीय संघाला विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचे किताब जिंकून देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. (this 3 players will make team india winner in odi world cup 2023)
हेही वाचा-
याला म्हणतात झोकून देणं! वर्ल्डकपपूर्वी राहुलने टायर ठेवून केला विकेटकीपिंगचा सराव, दिग्गजाने सांगितलं कारण
वर्ल्डकप 2023मध्ये आयसीसीकडून सचिनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान