इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामने खेळवल्यानंतर कोरोना व्हारसच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करावा लागला होता. त्यामुळे बीसीसीआयसमोर पुढे या हंगामातील उर्वरित ३१ सामने पूर्ण करण्याचे आव्हान होते. पण आता २९ मे रोजी बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की हे उर्वरित ३१ सामने युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्वच फ्रँचायझी आणि चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
आयपीएल २०२१ हंगामाच्या पहिल्या टप्प्यात अनेक संघांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. तर काही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली होती. पण आता दुसऱ्या टप्प्यात सर्वच संघांना पुन्हा एकदा नव्याने काही गोष्टींची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. अनेक संघांचे दुखापतग्रस्त खेळाडू पुन्हा संघात परतू शकतात, तर काही संघांतील खेळाडू माघार घेण्याची शक्यता आहे. याबरोबरच काही संघांचे कर्णधारच बदललेले दिसू शकतात. या लेखातही आपण अशा ३ संघांबद्दल आढावा घेऊ, ज्यांचे कर्णधार आयपीएल २०२१ च्या पुनरागमनानंतर बदलले जाऊ शकतात.
३. दिल्ली कॅपिटल्स
आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला होता. कारण त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर भारताकडून खेळत असताना इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. एप्रिलमध्ये त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला होता. त्याच्याऐवजी रिषभ पंतकडे दिल्लीचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
मात्र, आता आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्यास तब्बल साडेतीन महिने शिल्लक असल्याने या कालावधीत श्रेयस पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. त्याचमुळे तो आयपीएल २०२१ मध्ये पुनरागमन करुन दिल्लीचे नेतृत्व पून्हा आपल्या हाती घेऊ शकतो.
श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने चांगली कामगिरी केली आहे. श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली २०१९ हंगामात दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तर २०२० हंगामात दिल्ली उपविजेते ठरले होते.
२. सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल २०२१ हंगामाचा पहिला टप्पा अत्यंत निराशाजनक ठरला. त्यातच ६ सामन्यांनंतर त्यांना डेव्हिड वॉर्नरला संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकत नेतृत्त्वपदाचा मुकुट केन विलियम्सनच्या डोक्यावर चढवला.
आयपीएल २०२१ हंगामात हैदराबादने वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ६ सामने खेळले. त्यातील केवळ १ सामना जिंकण्यात संघाला यश आले. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच त्यानंतर विलियम्सनने नेतृत्व केलेल्या एका सामन्यात देखील हैदराबादला पराभवाचाच सामना करावा लागला.
पण आता आयपीएल २०२१ च्या दुसरा टप्पा सुरु होईल तेव्हा माध्यमांतील वृत्तानुसार न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात क्रिकेट मालिका होणार आहे. त्यामुळे विलियम्सन त्या मालिकेत व्यस्त होऊ शकतो आणि आयपीएलसाठी अनुपलब्ध राहू शकतो. त्यामुळे आता पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार बदलला जाऊ शकतो. कदाचीत पुन्हा वॉर्नरकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, किंवा भुवनेश्वर कुमार नेतृत्व करताना दिसू शकतो.
१. कोलकाता नाईट रायडर्स
आयपीएल २०२१ हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी खराब झाली. त्यांना ७ सामन्यांपैकी केवळ २ सामने जिंकण्यात यश आले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पण असे असतानाच त्यांचा कर्णधार ओएन मॉर्गन या दुसऱ्या टप्प्यासाठी अनुपलब्ध राहू शकतो.
कारण दुसरा टप्पा सुरु होणार आहे तेव्हा इंग्लंड संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक बरेचसे व्यस्त आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की खेळाडूंना आधी राष्ट्रीय संघाकडून आपले कर्तव्य बजावावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात इंग्लंडचे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.
याचकारणामुळे कोलकाताला मॉर्गन जर उपलब्ध नसेल तर दुसऱ्या कर्णधाराचा विचार करावा लागेल. कोलकाता दिनेश कार्तिककडे पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवू शकतात. कार्तिकने २०२० हंगामादरम्यान कोलकाताचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे तेव्हापासून मॉर्गन कोलकाताने नेतृत्व करत होता. कोलकाताच्या कर्णधारपदासाठी कार्तिकशिवाय आंद्रे रसल किंवा शाकिब अल हसन हे देखील पर्याय असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
तिसऱ्यांदा आयपीएल युएईमध्ये, पाहा तिथे सर्वाधिक धावा करणारे कोण आहेत ५ फलंदाज
WTC Final: इंग्लंड संघासाठी ५० कसोटी सामने खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरने निवडली भारतीय संघाची प्लेइंग ११
वयाचा हवाला देत निवडकर्त्यांनी केलं दुर्लक्ष; उनाडकट म्हणाला, ‘मी ३३ नाही २९चा आहे’