इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील, कोरोनाने बायो बबल भेदून प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले होते. खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने, आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु २९ मे रोजी झालेल्या बैठकीत,स्पर्धेच्या आयोजना बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या सप्टेंबर महिन्यात, युएई मध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी अनेक परदेशी खेळाडू उपलब्ध नसतील असा अंदाज आहे. अशातच कोलकाता नाईट रायडर्स संघापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
युएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सूत्र, ओएन मॉर्गनच्या हाती देण्यात आले होते. या हंगामात देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद ओएन मॉर्गनकडेच आहे. परंतु इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर एश्ले जाइल्स यांनी स्पष्ट केले आहे की, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये इंग्लंड संघातील खेळाडू सहभाग घेणार नाहीये. त्यामुळे ओएन मॉर्गन ऐवजी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद दिनेश कार्तिकला देण्यात येऊ शकते.
माजी कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने २ वेळेस जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१८ मध्ये गंभीरला दिल्ली संघात स्थान देण्यात आले होते. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद दिनेश कार्तिकला देण्यात आले होते. त्याने २०१८ पासून संघाचे नेतृत्व केले. परंतु कर्णधार म्हणून त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. २०२० मध्ये कार्तिकला, कर्णधार पदावरून काढून ओएन मॉर्गनला ही जबाबदारी देण्यात आली होती.
आता मॉर्गनच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकने संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “पॅट कमिन्सने आयपीएल स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. परंतु ओएन मॉर्गन बद्दल बोलायचं झालं तर ३ महिने अजूनही शिल्लक आहेत. यामध्ये खूप काही बदल होऊ शकतात. परंतु मला जर संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर मी तयार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
विराट किंवा रोहित नाही तर गावसकरांच्या मते हा आहे टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज
कमालच! सहा वर्षांचा चिमुकला चक्क धोनी स्टाइलमध्ये मारतो आहे हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडिओ
इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो हा महत्वाचा बदल