आयपीएल 2020 मध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर जोरदार विजय मिळवला. या हंगामात गुणतालिकेत पिछाडीवर असलेल्या मुंबई इंडियन्सने या विजयासह पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबई संघाचे विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र सलामीवीर क्विंटन डी कॉक याचा खराब फॉर्म या संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस लिन याला त्याच्याजागी संघात स्थान दिले जाऊ शकते.
डी कॉक ठरला अपयशी
डी कॉकने मागील हंगामात मुंबईकडून ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, तशी फलंदाजी त्याने अद्यापही केलेली नाही. या हंगामात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या पण पहिल्या चार सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
लिन आहे विस्फोटक फलंदाज
या हंगामात डी कॉकने 4 सामन्यांत केवळ 48 धावा केल्या आहेत. त्यामुळे हा संघ संकटात सापडलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला त्याला आता संघातून बाहेर काढावे लागेल. आगामी सामन्यांमध्ये ख्रिस लिनला त्याच्या जागी स्थान दिल्यास मुंबई इंडियन्सला फायदा होऊ शकेल. कारण लिन हा एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु या हंगामात त्याला अद्याप संधी मिळालेली नाही. लिन संघात आल्यावर मुंबईचा युवा फलंदाज ईशान किशन यष्टिरक्षण करताना दिसू शकतो.