गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (दि. २४ मे) आयपीएल २०२२मधील पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. हा सामना गुजरातने ७ विकेट्सने जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. मात्र, आता गुजरातसोबत अंतिम सामना खेळण्यासाठी २ महत्त्वाचे सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला महत्त्वाचा सामना म्हणजेच एलिमिनेटर सामना होय.
हा सामना बुधवारी (दि. २५ मे) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर एलिमिनेटर सामना खेळला जाईल. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात खेळला जाईल. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्याचा पत्ता या स्पर्धेतून कट होईल. तसेच, विजयी संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत होणाऱ्या राजस्थान संघाविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात भिडेल. या सामन्यात जो जिंकेल, त्या संघाला गुजरातविरुद्ध अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल.
कोलकाता येथे होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा एकदा ज्या खेळाडूंवर नजर राहील, त्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक फलंदाजांचा समावेश असेल. कोलकातामध्ये पावसाची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पाऊस झाला नाही, तर क्वालिफायर सामन्याप्रमाणे मैदानावर दव असेल. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अडचण निर्माण होऊ शकते. अशात कोणत्या ५ खेळाडूंवर नजर राहील, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
लखनऊ- बेंगलोर सामन्यात ५ खेळाडूंवर राहील नजर
१. फाफ डू प्लेसिस
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यावेळी चांगल्या लयीत दिसत आहे. तसेच, तो सलामीला फलंदाजी करत विरोधी संघाच्या गोलंदाजांच्या समस्या वाढवू शकतो. कर्णधार म्हणून तो कोणत्याही दबावाखाली न राहता फलंदाजीतून आपला दम दाखवत आहे. आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये त्याने ३ अर्धशतके झळकावत ४४३ धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, तो बेंगलोर संघातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
२. केएल राहुल
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याच्यावरही सर्वांच्या नजरा असतील. या भारतीय फलंदाजाने मागील काही वर्षांपासून चमकदार कामगिरी करत आहे. मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावर असो किंवा लीग स्पर्धेत असो. आता तो एका आयपीएल संघाचा कर्णधारही आहे. तो कर्णधार असूनही सलामीवीराच्या रूपात फलंदाजी करताना कोणत्याही दबावात दिसत नाही. मागील सामन्यातही याची झलक पाहायला मिळाली आहे. त्याने क्विंटन डी कॉक याच्यासोबत शतकी भागीदारी रचत अर्धशतक झळकावले होते. राहुलने आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये लखनऊसाठी सर्वाधिक ५३७ धावा चोपल्या आहेत. त्यात २ शतके आणि ३ अर्धशतके चोपली आहेत. तो बेंगलोरविरुद्धही चांगली सुरुवात करून देऊ शकतो.
३. विराट कोहली
माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दीर्घ काळापासून एका चांगल्या आणि मोठ्या डावाच्या प्रतीक्षेत होता. त्याची ही प्रतीक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सुरू होत आयपीएलपर्यंत आली होती. विराटने काही छोट्या खेळी केल्या. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, मागील सामन्यात त्याने हा दुष्काळ संपवला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ५४ चेंडूत ७३ धावांची वादळी खेळी करत आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले. आता गुजरात राजस्थानला पराभूत करत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. गुजरातविरुद्ध पुन्हा भिडण्यासाठी बेंगलोरला विराटकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा आहे.
४. क्विंटन डी कॉक
आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघाचा जोस बटलर आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल असून तिसऱ्या स्थानी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याचा क्रमांक लागतो. त्याने १४ सामन्यात फलंदाजी करताना ३८.६२च्या सरासरीने ५०२ धावा चोपल्या आहेत. डी कॉक याने मागील सामन्यात कोलकाताविरुद्ध जबरदस्त शतक (नाबाद १४० धावा) झळकावले होते. आता एलिमिनेटर सामन्यातही तो बेंगलोरसाठी अडचणी निर्माण करू शकतो.
५. वनिंदू हसरंगा
आतापर्यंत या यादीत फलंदाजांची नावे आली आहेत. मात्र, यामध्ये एक नाव गोलंदाजाचेही आहे. तो गोलंदाज म्हणजे वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) होय. हसरंगा आपल्या गोलंदाजीने सामना पालटण्याचा दम राखतो. श्रीलंकेचा हा फिरकी गोलंदाज आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या फिरकीपटूंना चोप बसला. मात्र, हसरंगाची गोलंदाजी जरा वेगळी मानली जाते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो अव्वलस्थानी असणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसोबत पर्पल कॅपच्या यादीत फक्त २ विकेट्स दूर आहे.
लखनऊ आणि बेंगलोर संघात होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत कोणता संघ दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्र ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गुजरातचा विजय किती खास? चेन्नईनंतर अशी संधी फक्त आता गुजरातच्या वाट्याला आलीये
गुजरातच उचलणार आयपीएल ट्रॉफी? आकडेवारी देतायेत ग्वाही, तब्बल १० वेळा झालंय ‘असं’