जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. चेन्नई येथे १८ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात जगभरातील अनेक मोठे क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शकीब अल हसन यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंमधील केदार जाधव, हरभजन सिंग, शिवम दुबे या खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावासाठीची अंतिम यादी बीसीसीआयने नुकतीच जाहीर केली आहे, ज्यामध्ये २९२ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
आयपीएल २०२१ साठी लिलावात सहभागी होणाऱ्या २९२ क्रिकेटपटूंमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व न केलेले १४७ क्रिकेटपटू सहभागी आहेत. त्यापैकी नुकतीच संपलेली देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी गाजवलेले व अवघी २० लाख रुपये आधारभूत किंमत असलेले पाच खेळाडू या लिलावात मोठ्या किमतीत विकले जाण्याची शक्यता आहे.
त्याच पाच खेळाडूंविषयी आपण जाणून घेणार आहोत
१) मोहम्मद अझरुद्दिन
केरळचा आक्रमक सलामीवीर मोहम्मद अझरुद्दीनवर या लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक-सलामीवीर असणारा अझरुद्दीन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून प्रसिद्धीझोतात आला. मुंबईविरुद्ध केलेल्या १३७ धावांच्या खेळीमुळे त्याच्यावर अनेक फ्रेंचायजींची नजर असेल. अझरुद्दीनवर सनरायझर्स हैदराबाद किंवा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मोठी बोली लावू शकतात.
२) अवि बरोट
सौराष्ट्राचा २८ वर्षीय आक्रमक फलंदाज अवि बरोट अनेक संघांच्या रडारवर असेल. अविने नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३२ चौकार व १२ षटकारांच्या सहाय्याने एक शतक व एक अर्धशतक ठोकत २८३ धावा कुटल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १८५ असा प्रभावी राहिला आहे.
३) चेतन सकारिया
सौराष्ट्राचा डावखुरा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. सौराष्ट्राच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत त्याने ५ सामन्यात १२ बळी मिळवले. यादरम्यान इकॉनामी रेट ४.९ इतका कमी होता. त्याच्या गोलंदाजीतील वैविध्यपणामुळे अनेक संघ त्याला खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवतील.
४) केदार देवधर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा केदार देवधर यावर्षी लिलावात मोठी रक्कम मिळवू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ मध्ये त्याने आठ सामने खेळताना ३४९ धावा काढल्या होत्या. देवधरचा स्ट्राईक रेट तितका उच्च नसला तरी, त्याचे सातत्य अनेक संघांसाठी फायदेशीर ठरू शकते.
५) राहुल गेहलोत
सेनादलकडून खेळणारा राहुल गेहलोत आगामी आयपीएल लिलावात सर्वांना चकित करू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने तीन अर्धशतके ठोकत २४४ धावा काढल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १७७ असा राहिला. ज्या आयपीएल संघांना चांगल्या भारतीय खेळाडूंची आवश्यकता आहे, ते संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
छोटा पॅक बडा धमाका! बेस प्राईज २० लाख असलेल्या ‘या’ खेळाडूंवर आयपीएल लिलावात पडणार पैशांचा पाऊस
चाळीशी पार करून ‘पठ्ठ्या’ उतरलाय आयपीएलच्या लिलावात, एकेकाळी खेळला होता विराटसोबत
आयपीएल लिलाव २०२१ : वाचा कोणत्या देशाचे किती खेळाडू आजमावणार नशीब






