काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका संपल्या. त्यानंतर आता सर्वांना इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची उत्सुकता लागली आहे. या हंगामादरम्यान आता अनेक भारतीय खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. दरम्यान, या हंगामात सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात एक वेगळीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
सर्वाधिक धावांसाठी स्पर्धा
सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या क्रिकेटपटूंमध्ये अव्वल क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने १९२ सामन्यांत ५८७८ धावा केल्या आहेत. तो या यादीत त्याच्या पाठोपाठ असलेल्या अन्य फलंदाजांच्या बराच पुढे आहे. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. रैनाने १९३ सामन्यांत ५३६८ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट आणि रैना या दोघांमध्ये तब्बल ५०० पेक्षाही अधिक धावांचे अंतर आहे.
त्यामुळे सध्या विराटच्या जवळ पोहचण्यासाठी अन्य क्रिकेटपटूंना अनन्यसाधारण कामगिरी करावी लागेल. मात्र या यादीत विराट व्यतिरिक्त पहिल्या ५ जणांमध्ये असलेल्या सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात सर्वाधिक धावा करत यादीत वरचे स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा रंगेल.
कारण या चौघांच्या आयपीएल धावांमध्ये खूप कमी अंतर आहे. रैनापाठोपाठ या यादीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने १४२ सामन्यांत ५२५४ धावा आयपीएलमध्ये केल्या आहेत. तसेच रोहित शर्मा २०० आयपीएल सामन्यांतील ५२३० धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर शिखर धवन पाचव्या क्रमांकावर असून त्याने १७६ सामन्यांत ५१९७ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे आत्तापर्यंत केवळ विराटसह रैना, वॉर्नर, रोहित आणि शिखर यांनाच आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार करता आला आहे. त्यामुळे आता या आयपीएल हंगामात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल की सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ५ क्रमांकांमध्ये काय बदल होणार, तसेच कोण कोणाला वरचढ ठरणार.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलवरही झाला कोरोना इफेक्ट; बक्षीस रक्कमेत झाली ‘एवढी’ घट
बापरे! ‘या’ पाच खेळाडूंना आयपीएल दरम्यान जावे लागले होते तुरूंगात
याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएलने नाकारलेला ‘हा’ खेळाडू चाललाय इंग्लंडला काऊंटी खेळायला