भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियममध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारत ८ गडी राखून विजय मिळवला आहे. भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाना पराभूत केले आहे. परंतु, न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय संघ तितका मजबूत संघ दिसून आला नाही.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडने पराभूत केले. न्यूझीलंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाला सलग तिसऱ्यांदा पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी भारताला न्यूझीलंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता. (This is the first instance of New Zealand beating India in three successive Tests)
१) वेलिंग्टन कसोटी सामना (२०२०)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये पार पडलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली होती. तर मयंक अगरवालने ३४ धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाला पहिल्या डावात सर्वबाद १६५ धावा करण्यात यश आले होते. न्यूझीलंड संघाकडून काइल जेमिसनने आणि टीम साउदिने प्रत्येकी ४-४ गडी बाद केले होते.
न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियम्सनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली होती. रॉस टेलरने ४४ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला ३४८ धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या डावातही भारतीय संघातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. मयंक अगरवालने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला १९१ धावा करण्यात यश आले होते. हा सामना जिंकण्यासाठी न्युझीलंड संघाला अवघ्या ९ धावांची आवश्यकता होती. या सामन्यात न्यूझीलंड संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता.
२) ख्राईस्टचर्च कसोटी सामना :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात २०२० मध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारत ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ५४ धावांची खेळी केली होती.
तसेच हनुमा विहारीने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २४२ धावा करण्यात यश आले होते. तर न्यूझीलंड संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या,टॉम लेथमने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली होती. तर काइल जेमिसनने ४९ धावांचे योगदान दिले होते. या डावात न्यूझीलंड संघाला सर्वबाद २३५ धावा करण्यात यश आले होते.
तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. या डावात चेतेश्वर पुजाराची २४ धावांची खेळी वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाला सर्वबाद १२४ धावा करता आल्या होत्या. तर न्यूझीलंड संघाला विजयासाठी १३२ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, टॉम लेथमने ५२ आणि टॉम ब्लंडेलने ५५ धावांची खेळी केली होती. हा सामना न्यूझीलंड संघाने ७ गडी राखून जिंकला होता.
३) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ( भारत विरुद्ध न्यूझीलंड)
पहिल्यांदाच झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली होती. तर विराट कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले होते. न्यूझीलंड संघाकडून काइल जेमिसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावा करण्यात यश आले होते.
तसेच न्यूझीलंड संघाकडून पहिल्या डावात डेवोन कॉनवेने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली होती. तर केन विलियमसनने ४९ धावांचे योगदान दिले होते. मोहम्मद शमीने या डावात ४ गडी बाद करत न्यूझीलंड संघाच्या अडचणीत वाढ केली होती. न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात २४९ धावा करण्यात यश आले होते.
यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने ३० धावांची खेळी केली होती. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या निराशाजनक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला अवघ्या १७० धावा करण्यात यश आले होते.
न्यूझीलंड संघाला या सामन्यात पहिल्या डावातील ३२ धावांच्या आघाडीमुळे विजय मिळवण्यासाठी अवघ्या १३९ धावांची आवश्यकता होती. हे आव्हान न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून पूर्ण केले होते. न्यूझीलंड संघाकडून केन विलियमसनने नाबाद ५२ तर रॉस टेलरने नाबाद ४७ धावांचे योगदान दिले होते.
महत्वाच्या बातम्या-
टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण
जून महिना, इंग्लंडचे मैदान, भारतीय संघ अन् आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना-एक अनोखा योगायोग






