टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर आले होते. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. मात्र, न्यूझीलंडने या सामन्यात ८ विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. परिणामी सामन्याच्या शेवटी न्यूझीलंडने भारताचा दारुण पाराभव केला.
भारतीय संघ टी-२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० विकेट्सने पराभूत झाला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडने ८ विकेट्सने पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा हा विश्वचषकातील सलग दुसरा पराभव आहे. विशेष बाब म्हणजे भारताने या दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केली आहे.
याव्यतिरिक्त टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे, ज्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली होती. टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ श्रीलंकेकडून शेवटच्या दोन टी२० सामन्यात पराभूत झाला होता. या दोन्ही सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली होती.
भारताचा श्रीलंकाविरुद्धच्या टी२० मालिकेत २-१ असा पराभव झाला होता. मालिकेतील शेवटचे दोन सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती आणि हे सामने गमावले होते. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ४ विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने पराभव झाला होता.
त्यामुळे ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतीय संघाने सलग चार टी-२० सामने गमावले आहे, ज्यामध्ये संघाने प्रथम फलंदाजी केली होती.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडमध्ये रविवारी पार पडलेल्या या सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी कराताना सात विकेट्सच्या नुकसानावर ११० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने भारताने दिलेले लक्ष्य अवघ्या १४.३ षटकात आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर गाठले आणि सामन्यात विजय मिळवला.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने ३५ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी संघाला मिळालेल्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने चार षटकांमध्ये २० धावा दिल्या आणि सर्वाधित तीन विकेट्स घेतल्या. तसेच इश सोधीने २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आसिफच्या आयुष्यातील सर्वात दु:खद घटना; २ वर्षाच्या लाडक्या लेकीचा झाला होता कँसरने मृत्यू, आजही…
वचन पाळले! चेन्नई सुपर किंग्सकडून ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा सन्मान, एक कोटी रुपयांसह दिली खास जर्सी
स्मिथवर शेन वार्नने साधला निशाणा, पण नेटकऱ्यांनी दिग्गजालाच टाकली गुगली






