भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच टी२० संघाच्या कर्णधारपदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी टी२० विश्वचषकानंतर तो नेतृत्व सोडेल. यानंतर, आयपीएलच्या उत्तरार्धाला सुरुवात होताच त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (आरसीबी) देखील आपला कर्णधार म्हणून हा अखेरचा हंगाम असेल, अशी घोषणा केली. विराटच्या या निर्णयानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर व आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला दोन विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गौतम गंभीर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला गंभीर?
विराटने आयपीएल २०२१ उत्तरार्धातील आपला पहिला सामना खेळण्याच्या पूर्वसंध्येला हा हंगाम आपला आरसीबीसह कर्णधार म्हणून अखेरचा हंगाम असल्याचे म्हटले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया देताना म्हटले,
“विराटच्या या निर्णयाने मी काहीसा चकित झालो. स्पर्धा सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकता? मला वाटते त्याची हा निर्णय जाहीर करण्याची वेळ चुकली आहे. स्पर्धा संपल्यावर ही तो हा निर्णय सांगू शकला असता. अशा निर्णयामुळे संघावर मानसिक दडपण येऊन संघाचा समतोल बिघडू शकतो.”
गंभीर पुढे म्हणाला,
“सध्या आरसीबी उत्तम स्थितीत आहे. असा निर्णय घेऊन तुम्ही खेळाडूंवर अतिरिक्त दबाव टाकता. खेळाडू विराटसाठी काहीतरी करायला हवे अशा मानसिकतेतून अधिकचा दबाव घेऊ शकतात. तुम्हाला संघासाठी जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा.”
सध्या आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी काबीज असून, आणखी तीन विजय मिळवल्यास ते प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतात.
विराटने सार्वजनिक केला निर्णय
आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील कोलकाता विरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी विराटने आपण आरसीबीचे कर्णधारपदी या हंगामानंतर सोडणार असल्याची घोषणा केली. मात्र, आपण जोपर्यंत आयपीएल खेळू तोपर्यंत केवळ आरसीबीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. विराट असा एकमेव क्रिकेटपटू आहे जो पहिल्या आयपीएलपासून एकाच संघाचा भाग आहे. २०१३ मध्ये त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो
जायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का? धोनीने दिले ‘हे’ उत्तर
मुंबईविरुद्ध ऋतु’राज’! नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान






