भारतीय क्रिकेट संघात सध्या फेरबदलाचे वारे वाहते आहे. डिसेंबर महिन्याच्या अंती भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करायचा आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला २६ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
या मालिकेसाठी बुधवारी (०८ डिसेंबर) भारताच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा झाली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या हातून कसोटी संघाचे उपकर्णधारपद (Ajinkya Rahane Vice Captaincy) काढून घेतले आहे. असे असले तरीही, रहाणे खेळाडू म्हणून संघात जागा मिळवण्यास यशस्वी ठरला आहे. यानंतर आता खराब फलंदाजी फॉर्ममध्ये असूनही रहाणेला कसोटी संघात अजून एक संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा झाला आहे.
संधी मिळूनही गेल्या वर्षभरात सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या रहाणेवर अजून एकदा विश्वास दाखवणारा व्यक्ती, राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या द्रविडच्या म्हणण्यावरुनच निवड समितीने रहाणेला कसोटी संघात सहभागी केले असल्याचे समजत आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयमधील वृत्तानुसार, रहाणेला महागुरू द्रविडने अंतिम संधी आहे. यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघात जागा देण्यात आली आहे. खराब फॉर्ममध्ये असले तरीही, रहाणेला स्वत:ला सिद्ध करण्याची अजून एक संधी मिळायला हवी असे द्रविडचे मत आहे. परंतु जर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही फ्लॉप ठरला, तर ही त्याची कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका ठरू शकते. (Dravid Gave Last Chance To Rahane)
याविषयी पीटीआयला बोलताना एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “रहाणेला कसोटी संघात कायम ठेवण्यामागचे अजून एक कारण हेही आहे की, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा दीर्घकाळापासून मोठ्या धावा करू शकत नाहीयेत. त्यामुळे हे तिन्ही अनुभवी फलंदाज खराब फॉर्ममधून जात असताना रहाणेला एकट्यालाच संघाबाहेर करणे चूकीचे ठरले असते.”
शुबमनची दुखापतही पडली रहाणेच्या पथ्यावर
याखेरीज कसोटी संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याची दुखापतही रहाणेच्या पथ्यावर पडली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन करणाऱ्या गिलला या मालिकेच्या अंती दुखापत झाली होती. याच कारणास्तव त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर करण्यात आले आहे. केएल राहुल किंवा मयंक अगरवाल यांच्यापैकी एकाला रोहित शर्मासोबत सलामीला खेळवत गिलला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मधल्या फळीत खेळवले जाण्याची संघ व्यवस्थापनाची योजना होती. परंतु तो दुखापतीमुळे हा दौरा करू शकणार नसल्याने रहाणेचे मधल्या फळीतील स्थान वाचले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडची कसोटीत वनडेप्रमाणे खेळी..! तेज तर्रार शतकासह बनला ‘विक्रमवीर’
हार्दिकची वनडेतील जागा धोक्यात! ‘या’ अष्टपैलूने विजय हजारे ट्रॉफीत शतक करत ठोठावलाय टीम इंडियाचं दार
जडेजाला पर्याय म्हणून बीसीसीआय तयार करतेय धोनीचा ‘शागिर्द’; दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी झाली निवड