युवा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी अप्रतिम खेळी केली होती. त्याच्या या प्रदर्शनानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. वेंकटेशने भारतासाठी टी-२० पदार्पण केले असले, तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला अद्याप संधी मिळालेली नाही. अशातच, सध्या सुरू असलेल्या विजय हजारे (Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत वेंकटेशने शतकी खेळी केली आहे आणि भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळण्यासाठी स्वतःची दावेदारी सिद्ध केली आहे.
वेंकटेशने गुरुवारी (९ डिसेंबर) मध्य प्रदेश संघासाठी खेळताना हे शतक केले आहे. हा सामना मध्य प्रदेश आणि केरळ संघात झाला. वेंकटेशने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ११२ धावांची खेळी केली. त्याने एकूण ८४ चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेश संघाने ३२९ धावांचे आव्हान उभे केले.
वेंकटेश अय्यरव्यतिरिक्त मध्य प्रदेश संघातील शुभम शर्मा ८२, तसेच अभिफेक भंडारी आणि रजत पाटीदार यांनी प्रत्येकी ४९ धावांची खेळी केली. संघाने शेवटच्या पाच षटकात जवळपास ४२ धावा केल्या आणि त्यांच्या तब्बल पाच विकेट्स गमावल्या. शेवटच्या टप्प्यात केरळने चांगली गोलंदाजी केल्यामुळे मध्य प्रदेश संघाला मर्यादित धावसंख्येवर समाधान मानावे लागले. केरळसाठी विष्णू विनोदने सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
हे शतक करण्यापूर्वी वेंकटेशने यावर्षीच्या सुरुवातीला विजय हजारे ट्रॉफीमध्येच एक तुफानी शतक केले होते. त्यावेळी वेंकटेशने हे शतक पंजाब संघाविरुद्ध खेळताना केले होते. त्याने या सामन्यात १४६ चेंडूत २० चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने १९८ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात वेंकटेशने सलामीवीराच्या रुपात फलंदाजी केली होती, तर मध्य प्रदेशविरुद्धच्या या सामन्यात वेंकटेश मध्य क्रमात फलंदाजी करत होता.
वेंकटेश अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमधील या सामन्यात शतक करून भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी सिद्ध केली आहे. भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे आणि त्याच्या खराब फॉर्ममुळे सध्या संघाच्या बाहेर आहे. अशात भारतीय संघ देखील नवीन अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. वेंकटेश अय्यरने जर त्याचे हे उत्कृष्ट प्रदर्शन असेच कायम ठेवले, तर येत्या काळात तो भारतीय संघातील त्याचे स्थान पक्के करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर दिग्गजाने उपस्थित केले ‘काऊंटी क्रिकेट सिस्टिम’वर प्रश्नचिन्ह
रोहितला वनडे संघाचा कर्णधार बनवल्याने खुश झाला पाकिस्तानी क्रिकेटपटू; म्हणाला…
“मुंबई इंडियन्स नाही डेक्कन चार्जर्समध्ये रोहितच्या नेतृत्वास पैलू पडले”