असे म्हटले जाते की, क्रिकेटमध्ये काही विक्रम केवळ मोडण्यासाठीच बनतात, परंतु असे काही विक्रम आहेत की, जे कुणीही मोडू शकत नाही. क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक महान खेळाडू होते. सर्वजण आपापल्या काळात जबरदस्त क्रिकेट खेळत असत, पण असेही काही खेळाडू आहेत ज्यांचे नाव क्रिकेटमधून कधीही मिटले जाणार नाही.
ब्रॅडमन, महाराजा रणजितसिंग, सीके नायडू आणि सचिन तेंडुलकर. या खेळाडूंकडून क्रिकेटलाही एक वेगळी ओळख मिळाली. सर्वानी त्यांच्या काळात विक्रम स्थापित केले, परंतु असे काही विक्रम आहेत जे की मोडणे अशक्य आहे.
30 वर्षाची कसोटी कारकीर्द
सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 40 व्या वर्षापर्यंत कसोटी सामने खेळला. त्याची कसोटी कारकीर्द 24 वर्षांची होती. सचिनने विक्रमांच्या राशी उभ्या केल्या पण विल्फ्रेड रोड्सच्या 30 वर्षांची कसोटी कारकीर्दीचा विक्रम मात्र तो मोडू शकला नाही. विलफ्रेड रोड्स हा इंग्लंडचा व्यावसायिक क्रिकेटपटू होता, जो इंग्लंडकडून 1899 ते1930 दरम्यान 58 कसोटी सामने खेळला होता. कसोटीत, रोड्सने 127 बळी घेतले आणि 2,325 धावा केल्या. कसोटीत एक हजार धावा आणि 100 गडी बाद करणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू होता. विलफ्रेड रोड्सचा 30 वर्षांची कसोटी कारकीर्दीचा विक्रम सध्यातरी मोडणे अशक्य वाटते.
एका कसोटीमध्ये घेतले 19 बळी
कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज अनिल कुंबळेने जिम लेकरच्या एका डावात 10 बळी घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण सामन्यात 19 बळी घेण्याचा विक्रम कुणालाही करता आला नाही. 31 जुलै 1956 रोजी इंग्लंडचा ऑफस्पिनर जिम लेकर यांनी इतिहास रचला. इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर, लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या चौथ्या सामन्यात 19 गडी बाद केले. सामन्याच्या पहिल्या डावामध्ये लेकर यांनी आपला हेतू स्पष्ट केला होता. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्यांनी 37 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. आपल्या कारकीर्दीत त्यांनी एकूण 193 बळी टिपले.
ब्रॅडमन यांच्या एका मालिकेतील 974 द्यावा
1930 मध्ये अॅशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांनी 974 धावा केल्या. आतापर्यंत कोणीही या विक्रमापर्यंत पोहोचलेले नाही. त्यानंतर सात फलंदाजांनी मालिकेत 800 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या व्हॉली हॅमंडने ऍशेस मालिकेच्या पाच सामन्यांमध्ये एकूण 905 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क टेलरने 1989 मध्ये अॅशेस मालिकेत 839 धावा केल्या. पण कोणीही ब्रॅडमन यांचा विक्रम पार करता आला नाही.