वेलिंगटन। आज(3 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारताच्या डावात शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करताना 5 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला.
या खेळीत त्याने टॉड ऍस्टलच्या गोलंदाजीवर 47 व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग षटकार मारले आहेत. ही त्याची वनडेमध्ये षटकारांची हॅट्रीक करण्याची चौथी वेळ आहे. याआधीही त्याने असे सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
वनडेमध्ये सलग चार वेळा षटकारांची हॅट्रीक करणारा हार्दिक हा गेल्या दोन दशकातील दुसराच फलंदाज आहे. याआधी असे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने केले आहे.
हार्दिकने वनडेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पाकिस्तानच्या इमाद वासिम आणि शादाब खान यांच्या गोलंदाजीवर प्रत्येकी सलग तीन चेंडूत तीन षटकार मारले होते. तर 2017 मध्येच ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍडम झम्पाच्या गोलंदाजीवरही त्याने असा कारनामा केला आहे.
वनडेमध्ये हार्दिक पंड्याने या गोलंदाजांविरुद्ध केली आहे षटकारांची हॅट्रीक-
इमाद वासिम – चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 (पाकिस्तान)
शादाब खान – चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 (पाकिस्तान)
ऍडम झम्पा – ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2017 (ऑस्ट्रेलिया)
टॉड ऍस्टल – भारताचा न्यूझीलंड दौरा 2019 (न्यूझीलंड)
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित शर्माची ती शतकांची मालिका अखेर खंडीत
–१० वर्षानंतर हार्दिकने केली सचिनच्या त्या विक्रमाची बरोबरी
–९० धावा करुनही अंबाती रायडूच्या नावावर झाला नकोसा विक्रम