वेस्ट इंडिज संघ सध्या भारत (India tour of west indies) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली होती. तर वनडे मालिकेनंतर आता टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील असे ३ खेळाडू होते, ज्यांनी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
१) हर्षल पटेल : वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रवी बिश्नोईसह हर्षल पटेलने देखील दोन गडी बाद केले. ज्यावेळी वेस्ट इंडिज संघातील फलंदाज शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत होते, त्यावेळी हर्षल पटेलने निकोलस पुरन (६१ धावा ) आणि ओडियन स्मिथला बाद करत माघारी धाडले. हर्षल पटेलने ४ षटक गोलंदाजी करत ३७ धावा खर्च केल्या.
२) रोहित शर्मा : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने १९ चेंडूंमध्ये ४० धावांची खेळी केली. २१०. ५२ च्या स्ट्राइक रेटने धावा करताना त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजावर दबाव कायम ठेवला होता. त्याने आपल्या खेळी दरम्यान ४ चौकार आणि ३ षटकार मारले.
३) ईशान किशन : रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या ईशान किशनने देखील चांगली सुरुवात करून दिली होती. ज्यावेळी रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत होता, त्यावेळी ईशान किशन एकेरी दुहेरी धावा घेत संयमी खेळी करत होता. त्याने रोहित शर्मा सोबत मिळून ६४ आणि विराट कोहली सोबत मिळून २९ धावांची भागीदारी केली होती.
भारतीय संघाने हा सामना जिंकून टी२० मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पुढील सामना शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
वनडेतील सर्वोत्तम खेळी तर कसोटी पदार्पणात शतक, ईडन गार्डन्सवर रोहित शर्माने केली आहे अशी कामगिरी