आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. आयपीएल २०२१चा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे. या लिलावात सर्व फ्रेंचायजी आपल्या संघात रिक्त असलेल्या जागा भरण्यावर भर देतील. या लिलावासाठी ऑस्ट्रेलिया तसेच आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेदेखील नाव नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे नाव असलेला स्मिथ या लिलावात मोठी रक्कम मिळवू शकतो.
स्मिथ मागील वर्षी आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेत्या राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार होता. युएई येथे झालेल्या या हंगामात स्मिथची वैयक्तिक कामगिरी सरासरी होती. तसेच, संघाला देखील गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे, राजस्थान रॉयल्सने त्याला करारमुक्त करण्याचे ठरवले.
स्मिथला राजस्थान रॉयल्स दरवर्षी १२.५० कोटी इतकी मोठी रक्कम देत असत. आता नव्याने, लिलावात उतरल्याने त्यासाठी इतर संघ चांगली बोली लावण्याची शक्यता आहे. आज आपण अशा तीन संघांविषयी जाणून घेऊया, ज्यांत स्मिथला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी रस्सीखेच होईल.
किंग्स इलेव्हन पंजाब
भारताचा प्रमुख फलंदाज केएल राहुल नेतृत्व करत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ स्मिथला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी इच्छुक असेल. सध्या पंजाबकडे लिलावासाठी इतर संघापेक्षा अधिक रक्कम शिल्लक आहे. पंजाब संघात राहुल व्यतिरिक्त मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन यांसारखे आक्रमक फलंदाज आहेत. संघ व्यवस्थापनाला एक बाजू लावून धरणारा फलंदाज हवा असेल तर, ते स्मिथकडे पाहू शकतात. तसेच, त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दांडगा अनुभव कर्णधार राहुलच्या उपयोगी येऊ शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नेतृत्व करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ (आरसीबी) स्मिथवर बोली लावण्याची शक्यता आहे. आधुनिक युगातील सर्वात्कृष्ट फलंदाज मानल्या जाणाऱ्या विराट व एबी डिव्हिलियर्स यांच्या सोबतीला स्मिथ संघात दाखल झाल्यास आरसीबीची फलंदाजी अधिक मजबूत होईल.
आरसीबीने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचला सलामीवीर म्हणून संघात सामील केले होते. मात्र, तो पूर्णतः अपयशी ठरला. त्याच्या जागी स्मिथला सलामीवीर म्हणून खेळविण्याचा विचार आरसीबी संघ व्यवस्थापन करू शकते. स्मिथ २०१० च्या हंगामावेळी आरसीबी संघाचा सदस्य होता.
चेन्नई सुपर किंग्स
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नेतृत्व करत असलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. अनेक वरिष्ठ खेळाडू संघात असल्याने यावर्षी बरेच खेळाडू आपली अखेरची आयपीएल खेळू शकतात. स्वत: धोनीदेखील अंतिम वेळी आयपीएल खेळू शकतो.
त्यामुळे, आगामी हंगामाचा कर्णधार म्हणून सीएसके व्यवस्थापन स्मिथकडे पाहू शकते. स्मिथच्या नेतृत्वात रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने २०१७ आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या संघात धोनी एक खेळाडू म्हणून सहभागी झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
नॅथन लायनला जर्सी भेट, मात्र रुटला काहीच नाही? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विचारला प्रश्न
कसोटी क्रमवारी: जेम्स अँडरसनची तिसऱ्या स्थानी झेप; अश्विन, बुमराह या क्रमांकावर
क्या बात! पृथ्वी शॉ झाला उपकर्णधार, आता धडाकेबाज फटकेबाजी करुन टीकाकारांना देणार चोख उत्तर