आयपीएलच्या 14 व्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ज्याप्रकारे चेन्नई सुपर किंग्जला मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही पराभूत केले ते खरेच कौतुकास्पद ठरले. कारण कर्णधार म्हणून रिषभ पंत आयपीएलमधील पहिलाच सामना खेळत होता. तसेच त्यांचे काही प्रमुख खेळाडूही संघाबाहेर होते. तरीही दिल्लीने संघाने सामना आपल्या नावे केला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 7 गडी गमावत 188 धावा उभारल्या. प्रत्युत्तरादाखल दिलिलीने 18.4 षटकातच 3 गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईचे आव्हान पूर्ण केले. दिल्ली संघाने सामन्याच्या सुरुवातीला पकड मिळावली होती. पण सुरेश रैनाच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने सामना पुन्हा आपल्या बाजूला खेचला. परंतु दिल्लीनेही प्रयत्न सुरू ठेवत सामना एकहाती जिंकला. यावेळी चेन्नईची कोणतीही रणनीती मैदानावर लागू झाली नाही.
येथे आम्ही या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाची काही प्रमुख कारणे दिली आहेत. ती आपण पाहूया…
– पहिले कारण म्हणजे, चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या एकावेळी 200 च्या पुढे जाणार असे दिसत असताना, दिल्लीचा गोलंदाज आवेश खानने या धावगतीवर अंकुश लावला. त्याने केवळ उत्कृष्ट गोलंदाजीच केली नाही; तर बळी घेत चेन्नईची धावांची गतीही कमी केली. त्याने 4 षटकांत केवळ 23 धावा देऊन 2 बळी घेतले.
– दुसरे कारण म्हणजे, वेगवान फलंदाजी करत असलेल्या पृथ्वी शॉ याला बाद करण्याच्या चेन्नईला दोन संधी मिळाल्या. परंतु क्षेत्ररक्षक त्याचा झेल पकडण्यात अपयशी ठरले. त्यावेळी तो 50 पेक्षा कमी धावांवरती फलंदाजी करीत होता. पहिल्यांदाच सीएसकेच्या क्षेत्ररक्षकांनी त्याचा झेल पकडला असता, तर दिल्ली संघाला भक्कम सुरुवात मिळाली नसती. याबरोबरच विकेट गेल्याने त्यांचा दबावही वाढला असता. यामुळे चेन्नईला सामन्यात पुनरागमन करता आले असते, पण तसे झाले नाही.
– तिसरे कारण म्हणजे, दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने सलामीला येऊन हा सामना एकतर्फी जिंकला. दोघांनीही विस्फोटक खेळीने चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजांची पळता भुई थोडी करत सामना दिल्लीच्या झोळीत टाकला. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 138 धावांची भागीदारी साकारली. नंतर हे दोघेही बाद झाले पण तोपर्यंत सामना पूर्णपणे सीएसकेच्या हातातून निसटला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बलाढ्य चेन्नईवर मात करण्यात ‘या’ खेळाडूंनी उचलला खारीचा वाटा; पाहा दिल्लीच्या विजयाचे नायक
पराभवाचं दु:ख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड