इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा पहिला टप्पा पार पडला असून आता दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याने संघाचे नेतृत्व सोडले आहे. त्याच्याऐवजी चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद पुन्हा एकदा एमएस धोनी याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
खरंतर आयपीएल २०२२ हंगामापूर्वी (IPL 2022) धोनीने (MS Dhoni) चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवली होती. मात्र जडेजाने पहिल्या ८ सामन्यात नेतृत्व केल्यानंतर वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी पुन्हा कर्णधार झाला. दरम्यान, जडेजा आयपीएल हंगामाच्या मध्येच कर्णधारपद सोडणारा पहिला कर्णधार नाही. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी असा निर्णय घेतला आहे. पण त्यामागे विविध कारणे होती. आता जडेजानेही असा निर्णय घेण्यामागे काय महत्त्वाची कारणे असू शकतात, याचा आपण आढावा घेऊ.
कर्णधारपदाचा कमी अनुभव
चेन्नई सुपर किंग्सचे २००८ पासून एमएस धोनीने १२ वर्षे कर्णधारपद सांभाळले होते. धोनीने चेन्नई संघाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्याचा वारसदार म्हणून पुढे येणाऱ्या क्रिकेटपटूवर मोठी जबाबदारी असणार हे निश्चित होते. जडेजाला जेव्हा धोनीच्या जागेवर कर्णधार म्हणून निवडण्यात आले तेव्हा तो संघातील वरिष्ठ खेळाडू असल्याचाही एक विचार होता. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाच्या अनुभवाचा विचार करायचा झाल्यास तो त्याबाबत खूपच मागे होता.
कदाचीत हीच गोष्ट चेन्नईला आणि जडेजाला महागात पडली असावी. कारण जडेजाने आयपीएलमध्ये कर्णधारपद सांभाळण्यापूर्वी १५ वर्षांपूर्वी अखेरचे नेतृत्त्व केले होते. त्याने २८ ऑक्टोबर २००७ रोजी १९ वर्षांखालील विनू मंकड स्पर्धेत राजकोटमधील वेस्टर्न रेल्वे ग्राऊंडवर १९ वर्षांखालील सौराष्ट्र संघाचे नेतृत्त्व केले होते. तो १९ वर्षांखालील मुंबई संघाविरुद्ध सामना झाला होता. त्यानंतर त्याने एकदाही कोणत्याच स्तरावर कुठल्याही संघाचे नेतृत्त्व केलेले नव्हते. त्यामुळे कर्णधारपदाचा काहीच अनुभव नसणे जडेजाला त्रासदायक ठरले असावे.
संघाची खालावलेली कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स गतविजेते आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ८ सामन्यांमधील ६ सामन्यात पराभव पत्करला. यातील ४ पराभव त्यांना पहिल्या चार सामन्यात सलग मिळाले. विशेष म्हणजे हंगामातील पहिले चार सामने पराभूत होण्याची ही चेन्नईची पहिलीच वेळ ठरली. त्यानंतरही चेन्नईला विजयाची लय कामय ठेवता आली नाही. त्यामुळे संघावर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे चेन्नई संघाची खालावलेली कामगिरी हे देखील जडेजाचे कर्णधारपद सोडण्यामागचे कारण असू शकते.
वैयक्तिक कामगिरीवर परिणाम
जडेजाला कर्णधारपदाचा दबाव झेलता आला नाही, याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण जडेजाची वैयक्तिक कामगिरीही फारशी चांगली झाली नाही. त्याने ८ सामन्यात चेन्नईचे नेतृत्व करताना फलंदाजीत ११२ धावा केल्या. तसेच केवळ ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणातही त्याच्याकडून चूका होताना दिसल्या.
तसेच त्याच्या नेतृत्वात त्याच्यावर धोनी, अंबाती रायुडू, ड्वेन ब्रावो, मोईन अली अशा अनुभवी खेळाडूंनाही सांभाळण्याचा दबाव होता. अशा वेळी हा दबाव जडेजाच्या नेतृत्वातील मोठा अडथळा ठरला असण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकाच षटकात ५५ धावा चोपणारा ‘हा’ फलंदाज इंग्लंडच्या संघात करणार कमबॅक, संपणार ३ वर्षांची प्रतिक्षा
ताशी १५०हून अधिकच्या गतीने चेंडू फेकणाऱ्या उमरान मलिकवर गांगुलीही फिदा; वाचा काय म्हणाला ‘दादा?’
दिल्लीच्या गोलंदाजांची केएल राहुलकडून मनसोक्त धुलाई, ‘या’ खास यादीतील बनला नवा ‘सिक्सर किंग’