आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्याचे आणखी एक प्रकरण आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथे समोर आले आहे. या आरोपींवर कारवाई करत आरबीएस कॉलेज व्यवस्थापनाने तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. पाकिस्तानच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करणे आणि पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देत व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट केल्याचा आरोप विद्यार्थ्यांवर आहे.
राजा बलवंत सिंग इंजिनीअरिंग टेक्निकल कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या विरोधात जगदीशपुरा पोलिस ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युवा शाखेच्या स्थानिक नेत्यांनी तक्रार दाखल केली होती. आग्रा शहराचे पोलीस आयुक्त विकास कुमार यांनी सांगितले की, आरबीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात एक प्रकरण समोर आले असून, त्याबाबत पोलिसांकडे तक्रार आली आहे. त्याआधारे कारवाई केली जाईल.
विकास कुमार म्हणाले, “भारत-पाकिस्तान सामन्यानंतर व्हॉट्सअॅपवर असे काही मेसेज लिहिले गेले होते, जे देशाच्या विरोधात होते. यासंदर्भात तक्रार देण्यात आली असून, त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित पुरावे पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात येतेय.”
भारतात पाकिस्तानचे विजयानंतर काही ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. दिल्लीमध्ये भारत पराभूत झाल्यानंतर काही अज्ञातांनी फटाके फोडले होते. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने या प्रकरणावर मत व्यक्त करत लोक दांभिकता करत असल्याचे म्हटलेले.
भारताचा झाला होता पराभव
तब्बल २९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघाला विश्वचषकात पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले होते. भारताने आतापर्यंत ७ वेळा वनडे विश्वचषक आणि ५ वेळा टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले होते. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यावर अनेक चाहत्यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. शमीवर धार्मिक टीका झाल्यानंतर भारताचे आजी-माजी क्रिकेटपटू त्याच्या समर्थनात उतरले आहेत.