तिलक वर्माला (Tilak Verma) विजय हजारे ट्रॉफीदरम्यान अचानक त्रास जाणवू लागला. त्याने ‘ग्रोइन’मध्ये (ओटीपोटात) वेदना होत असल्याची तक्रार केली, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यामुळे तो किमान 2 आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहील. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे की, तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या 3 टी-20 सामन्यांतून बाहेर झाला आहे, मात्र बोर्डाने अजून त्याच्या पर्यायी खेळाडूची (रिप्लेसमेंट) घोषणा केलेली नाही. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash chopra) यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, शुबमन गिल किंवा यशस्वी जयस्वाल हे त्याचे रिप्लेसमेंट नसावेत.
आकाश चोप्राने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने म्हटले, तिलक वर्मा दुखापतग्रस्त आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह असेल. आता एक नवीन खेळाडू शोधावा लागेल. तो शुबमन गिल असू शकतो का? मी म्हणेन नाही, गिलही नको आणि यशस्वी जयस्वालही नको. का? कारण तुम्हाला सलामीवीराची गरज नाही. तिलक वर्मा तीन किंवा चार नंबरवर फलंदाजी करतो, त्यामुळे तुम्हाला मध्यफळीत (मिडल ऑर्डर) फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. जर तो थोडी गोलंदाजीही करू शकला तर अधिक उत्तम, पण तुम्हाला ओपनर तर नकोच आहे.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, मी म्हणेन श्रेयस अय्यर, ‘सरपंच साहेबांची’ तुम्ही तातडीने निवड करा. तो आधीच चांगले खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. आता संधी मिळत आहे, इथे मिडल ऑर्डर फलंदाजाची गरज आहे, शिवाय तो अनुभवी सीनियर खेळाडू देखील आहे. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे.,पण जर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला श्रेयस अय्यरसोबत जायचे नसेल, तर मी दुसरा पर्याय म्हणून रियान परागची निवड करेन. तो गोलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. तिसरा पर्याय म्हणून मी जितेश शर्माचे नाव घेईन. पण माझी पहिली पसंती श्रेयस अय्यर आहे.
बीसीसीआयने टिळक वर्माबाबत जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारतीय फलंदाज तिलक वर्मा याच्यावर बुधवारी, 7 जानेवारी रोजी राजकोटमध्ये पोटाच्या समस्येसाठी शस्त्रक्रिया झाली. त्याला गुरुवारी सकाळी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आणि तो शुक्रवारी हैदराबादला परत जाईल. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून सुधारणा होत आहे. जेव्हा त्याची लक्षणे पूर्णपणे बरी होतील आणि जखम भरेल, तेव्हा तिलक फिजिकल ट्रेनिंग सुरू करेल आणि हळूहळू कौशल्य-आधारित (Skill-based) उपक्रमांकडे वळेल. तो न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन टी-20 सामन्यांतून बाहेर पडला आहे. उर्वरित दोन सामन्यांमधील त्याच्या उपलब्धतेचा अंदाज ट्रेनिंग दरम्यानच्या प्रगतीवरून घेतला जाईल.






