गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) 200 व्या टी20 सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघाकडून दोन युवा खेळाडू तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पदार्पण केले. यापैकी तिलक या सामन्यात चांगली छाप पाडण्यात यशस्वी ठरला. या सामन्यानंतर बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली.
तिलक याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात 39 धावांची एक आक्रमक फलंदाजी केली. भारतीय संघाने 28 धावांवर दोन विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर तिलकला फलंदाजीसाठी संधी मिळाली. तिलकने आपल्या आयुष्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचला. त्याने वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या षटकात एकापाठोपाठ 2 षटकार मारले. तिलकने 177.27 या स्ट्राईक रेटने 22 चेंडूत 39 धावा केल्या. या सामन्यात तिलकने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या.
सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“भारतीय संघासाठी खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझे हे स्वप्न लवकरच पूर्ण झाले असे मला वाटते. संधी मिळाल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न असून, मी त्या स्वप्नाकडे नक्कीच वाटचाल करेल.”
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 150 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करता आल्या. वेस्ट इंडीज संघासाठी महत्त्वपूर्ण तीन बळी घेणारा जेसन होल्डर सामनावीर ठरला.
(Tilak Varma Said Winning World Cup For Team India Is My Goal)
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी आयर्लंडने घोषित केला संघ, नेतृत्वातही बदल
टी20 वर्ल्डकप 2024 साठी उथप्पा ‘या’ खेळाडूला पाहतोय फिनिशर म्हणून, कारण देत म्हणाला…