---Advertisement---

बेन स्टोक्सच्या ‘त्या’ विधानावर भडकला ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू

On: सोमवार, नोव्हेंबर 18, 2019 7:15 PM
---Advertisement---

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने डेव्हिड वॉर्नरबद्दल विवादात्मक विधानाबद्दल ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन स्टोक्सवर भडकला आहे. पेनने म्हटले आहे की स्टोक्सने स्वत: चे पुस्तक विकण्यासाठी वॉर्नरचे नाव घेतले.

स्टोक्सने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, यावर्षी ऍशेस मालिकेदरम्यान हेडिंग्ले येथे केलेली विजयी खेळी हा त्या डावात वॉर्नरकडून सातत्याने केलेल्या स्लेजिंगचा परिणाम होता.

‘मी स्लिपमध्ये संपूर्ण वेळ वॉर्नरच्या जवळ उभा होतो आणि आपल्याला मैदानावर बोलण्याची परवानगी असते, परंतु तो स्टोक्सला कोणताही अपमानस्पद शब्द बोलत नव्हता किंवा त्याला चिडवत नव्हता. स्वत: चे पुस्तक विकण्यासाठी त्याने वॉर्नरच्या नावाचा वापर केला आहे, यासाठी बेन स्टोक्सला शुभेच्छा,‘ असे पेन म्हणाला.

‘वॉर्नरने त्या संपूर्ण मालिकेत स्वत: ला चांगले हाताळले. ऍशेस दरम्यान वॉर्नरने ज्या प्रकारे स्वत: ला हाताळले ते आश्चर्यकारक आहे. खास करून,  जेव्हा त्याला धावा करता आल्या नाहीत’,  असेही पेन म्हणाला.

वॉर्नर यावर्षीच्या ऍशेस मालिकेत खराब फॉर्ममध्ये होता. त्याला 10 डावात केवळ एकच अर्धशतक करता आले होते.

या ऍशेस मालिकेतील हेडिंग्ले येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवला होता. या सामन्यात इंग्लडकडून बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात नाबाद 135 धावांची शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

त्याने ही खेळी करताना जॅक लीचबरोबर शेवटच्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय साकारुन दिला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---