इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत जेतेपद जिंकले. सोबतच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळही संपविला. हे विजेतेपद न्यूझीलंडसाठी खूप महत्वाचे होते.
सलग दोनदा आयसीसी विजेतेपदाच्या अगदी जवळ येऊन त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१५ मध्ये वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. यानंतर चार वर्षांनी न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. परंतु, त्यावेळीही यजमानांविरूद्ध अगदी अटीतटीच्या सामन्यात, सुपर ओवरनंतर बाऊंड्री काउंटिंगवर त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
मात्र, यावेळी त्यांनी खेळाच्या दीर्घ स्वरुपात विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. या विजेतेपदानंतर न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टिम साऊदी याने प्रतिक्रिया दिली आहे.
हा जल्लोष अनेक दिवस चालणार
न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज असलेल्या टिम साऊदीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दमदार गोलंदाजी करत सहा फलंदाजांना बाद केले होते.
या सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “या संघाचा एक भाग होणे हे अद्भुत आहे. आम्ही दोन वर्षांपासून यासाठी कठोर परिश्रम घेत होतो. यात केवळ १५ खेळाडूंचा नाहीतर, इतरही खेळाडूंचा वाट आहे जे मागील पाच ते सहा वर्षांपासून संघाचा भाग आहेत. प्रत्येकाच्या योगदानाने आम्ही येथे पोहोचलो. ही वेळ खूप खास आहे. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. आता या विजयाची नशा उतरायला वेळ लागेल. हा जल्लोष अनेक दिवस चालणार आहे.”
इतक्या धावांसाठी खूप वेळ लागला
साऊदीने आपली बात पुढे नेताना म्हटले, “१३९ धावा करण्यास इतका वेळ लागेल असे मला वाटले नव्हते. ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकजण खूप नर्व्हस होता. मात्र, खेळपट्टीवर दोन अनुभवी फलंदाज होते, जे अनेक वर्षांपासून खेळत आहेत. आम्ही त्यांच्या भरवशावर चिंतामुक्त झालो.”
साऊदीने या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडसाठी ११ सामन्यात सर्वाधिक ५६ बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड संघावरील अभिनंदनाचा ओघ थांबेना; ‘या’ आजी-माजी खेळाडूंनी केले अभिनंदनपर ट्विट
आपल्या देशाच्या चाहत्यांवर भडकला न्यूझीलंडचा ‘हा’ अष्टपैलू; म्हणाला, ‘त्यांच्या कृतीबद्दल माफ करा’