इंग्लंडमधील साऊथॅम्पटनमध्ये १८ ते २३ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्याचा निकाल सहाव्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी लागला होता. यादिवशी भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात रिषभ पंत फलंदाजी करत असताना त्याचा झेल टीम साऊदीच्या हातून निसटला होता. हा झेल सुटला तेव्हा काय विचार मनात आलेला याबद्दल आता साऊदीने खुलासा केला आहे.
साऊदीकडून सुटला झेल
या सामन्याच्या अखेरच्या दिवशी जेव्हा भारताकडून दुसऱ्या डावात रिषभ पंत ५ धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याने काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टीम साऊदीकडून त्याचा झेल सुटला. त्यावेळी साऊदीच्या मनात विजेतेपद गमावण्याची शंका चूकचूकली होती. पण हा झेल फार महागात पडला नाही. पुढे ४१ धावांवर पंत बाद झाला, तसेच हा सामना न्यूझीलंडने जिंकत पहिले कसोटी विश्वविजेतेपद पटकावले.
या सुटलेल्या झेलबद्दल नुकतेच साऊदीला मॅच अँड हेन्री पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारला. त्यावर बोलताना साऊदी म्हणाला, ‘जर मी म्हटलो की तो झेल सोडल्यानंतर माझ्या डोक्यात काहीच आले नाही, तर मी खोटे बोलत असेल. कारण, ज्याप्रकारे पंतच्या फलंदाजीची शैली आहे, तो ४ ते ५ षटकांत खेळाची दिशा पलटू शकतो.’
साऊदी पुढे म्हणाला, ‘सामन्यात आम्ही मजबूत स्थितीत होतो आणि काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर तो झेल सोडल्यानंतर माझ्या मनात विचार आला की आमच्या हातून विजेतेपद निसटले. पण मला लगेचच वाईट विचारांना मनातून काढून टाकायचे होते, कारण पुढचे षटक मला टाकायचे होते. हो, पण जेव्हा पंत बाद झाला, तेव्हा मला फार बरे वाटले.’
तसेच साऊदी म्हणाला, ‘झेल सोडणे कोणत्याही खेळाडूसाठी वाईटच असते. त्यावेळी असे वाटते की आपल्यामुळे आपल्या संघसहकाऱ्यांचे मनोबल खालावत आहे.’
न्यूझीलंडने जिंकला सामना
अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर दुसऱ्या डावात १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने वैयक्तिक अर्धशतक करताना अनुभवी फलंदाज रॉस टेलरसह नाबाद ९६ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे न्यूझीलंडने ४६ व्या षटकात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल २० वर्षांनंतर मेस्सीने सोडली बार्सिलोनाची साथ?
भारताच्या माजी निवडसमिती अध्यक्षांनी फलंदाजांवर फोडले WTC फायनलमधील पराभवाचे खापर, म्हणाले…