ऑलिम्पिक… खेळांच्या दुनियेतील अशी स्पर्धा ज्या स्पर्धेत सहभागी व्हायचं आणि आपल्या देशासाठी मेडल घेऊन पोडियमवर उभे रहायचं हे स्वप्न प्रत्येक खेळाडू खेळात करिअर करायचं ठरवल्या ठरवल्या मनात पक्के करतो. दर चार वर्षांनी भरवला जाणारा खेळांचा हा कुंभमेळा यावर्षी जिद्दी जपान्यांच्या देशात भरवला गेला. खरंतर, हे ऑलिम्पिक २०२० मध्येच होणार होते. मात्र, २०२० मध्ये मानगुटीवर कोरोना नावाचे भूत असे काय बसले; जे अद्यापही पूर्णपणे उतरायचे नाव घेत नाही. असो, तर बरोबर एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर जपानची राजधानी टोकियो येथे २३ जुलै २०२१ रोजी ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलीत करण्यात आली आणि खेळांच्या या महामेळ्यास प्रारंभ झाला. मात्र, एक उणीव यावेळेस ही होती की, खेळांची जान असणारे प्रेक्षक या वेळी कोणत्याच स्टॅन्डमध्ये असणार नव्हते.
ऑलिम्पिक आणि भारत हे समीकरण घ्यायचे ठरवले तर, आपला खंडप्राय भारत देश या ऑलिम्पिक स्पर्धांचा पदक विजेत्या देशांमध्ये कितीतरी माघारला आहे हे वास्तव कोणीही नाकारत नाही. तरीही, यावेळी टोकियो येथे भारत एक आकडी पदकांच्या पुढे जाणार याची खात्री क्रीडाप्रेमींना होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारताने आपल्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठे पथक टोकियो येथे पाठवले होते. देशभरातील गुणवान १२६ खेळाडू १८ खेळांमध्ये आपले कसब जगाला दाखविण्यासाठी कंबर कसलेले.
ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा तिरंगा डौलात जगासमोर नेण्याचे काम या वेळी ‘भारत की बेटी’ बॉक्सर मेरी कोम व देशाचा राष्ट्रीय खेळ असलेल्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांच्या समर्थ खांद्यावर होते. जपानच्या संस्कृतीची ओळख करून देणारा उद्घाटन सोहळा अगदी नेत्रदीपक असाच म्हणावा लागेल.
भारत यावेळी रिओ ऑलिम्पिकमधील निराशा झटकून नवे स्वप्न ऑलिम्पिकच्या पटलावर पाहत होता. नेहमीप्रमाणे नेमबाजी, कुस्ती व बॉक्सिंग या खेळांमध्ये प्रामुख्याने आपले खेळाडू मेडल जिंकतील, अशी आशा सर्वांना होती. त्याव्यतिरिक्त तिरंदाजी व बॅडमिंटनमधील काही सुखावणाऱ्या प्रदर्शनामुळे मेडल येऊ शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते. मात्र, हे ऑलिम्पिक काहीतरी खास असणार, याबाबत सर्वांचे एकमत झालेले.
ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने भारताचे आव्हान सादर केले. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याची प्रबळ दावेदार असताना अगदी नाहक चुकीमुळे ती मेडल मिळविण्यापासून वंचित राहिलेली. मात्र, यावेळी १३५ कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार वाहून मजबूत झालेल्या तिच्या खांद्यावर सिल्वर मेडल उचलण्यासाठी लागणारे वजन काहीच नव्हते. ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी तिने स्वप्नवत कामगिरी करत सिल्वर मेडल आपल्या नावे केले आणि वेटलिफ्टिंगमधील २१ वर्ष जुना मेडलचा दुष्काळ संपुष्टात आणला. कर्णम मल्लेश्वरी यांच्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मेडल मिळवून देणारी ती केवळ दुसरी भारतीय खेळाडू बनली.
मीराबाई चानू हिने ऑलिम्पिक मेडल टॅलीमध्ये भारताचे नाव नोंदवले आणि जणू काही भारतीय खेळाडूंना स्फुरण चढले. राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीच्या पुरुष आणि महिला संघांनी विजयांचा धडाका लावला. केवळ मेरी कोममूळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय बॉक्सिंगचे असलेले नाव पुसण्याचे काम लवलिना बोर्गोहेन व पूजा रानी या तरुण महिला बॉक्सर्सने केले.
भारतीयांना लढाईतील तलवारबाजी सोडल्यास ऑलिम्पिकमध्ये देखील तलवारबाजी हा खेळ असतो हे माहीतच नव्हते. या खेळाची ओळख भवानी देवी या मुलीने सर्वांना करून दिली. लग्नात घोडा नाही म्हणून रुसून बसणारे अनेक नवरदेव सर्वांच्या आसपास असतात. मात्र, याच घोड्यावर बसून घोडेस्वारी करत ऑलिम्पिकचे मैदान गाजवता येते हे फौआद मिर्झा याने दाखवून दिले. जुडो व नौकानयन हे क्वचित चॅनल बदलल्यावर दिसणारे खेळ भारतीय पहाटे उठून पाहू लागले.
एकीकडे रोज नवेनवे युवा खेळाडू काहीतरी आश्चर्यकारक निकालाची नोंद करत असताना, अनुभवी खेळाडू डगमगताना दिसले. या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीसाठी भारताचे तब्बल १५ खेळाडू मेडलच्या आशेने टोकियोला पोहोचलेले. मात्र, त्यातील एकाचाही नेम मेडलवर लागला नाही. तशीच गत तिरंदाजीतही झाली. दीपिका कुमारी भारताची सर्वात मोठी ‘मेडल होप’ म्हणून चौथ्यांदा ऑलिम्पिक वारी करत होती. मात्र, टोकियोच्या हवेने तिच्यासह अतानू दास व प्रवीण जाधव यांना साथ दिली नाही. परिणामी, मेडलच्या निशाण्यापासून ह्या सर्वांचेच बाण भरकटले. स्विमिंग, टेनिस आणि टेबल टेनिसमध्ये आपण मागच्या चार-पाच ऑलिम्पिकप्रमाणे फक्त हजेरी लावण्याचे काम केले.
स्पर्धा जशीजशी अखेरीकडे येऊ लागली तशीतशी चुरस वाढली. मेरीकोम व विनेश फोगट या ‘फिक्स’ मेडल घेऊन येणार असे वाटत असतानाच दोघींना मोकळ्या हाताने परतावे लागले. अर्थात, त्यांनी याची काही कारणे दिली व वादही निर्माण झाले. असो. मेरी कोम अपेक्षित असा ‘गोल्डन पंच’ लावण्यात अपयशी ठरली असली तरी, भारत टोकियोमधून बॉक्सिंगमध्ये रिकाम्या हाताने जाणार नाही, याची खबरदारी लवलिना बोर्गोहेन या आसामच्या मुलीने घेतली. कमालीचा आक्रमक खेळ दाखवत तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत देशासाठी एक ब्राँझ मेडल पक्के केले. दुर्दैवाने, उपान्त्य फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, पुढे येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मेरीकडून हुकलेला ‘ गोल्डन पंच’ नक्की पाहायला मिळेल, याची झलक तिच्यामध्ये दिसली आहे.
असे म्हणतात की, भारत हा मातीतल्या माणसांचा देश आहे. मातीतल्या या माणसांचा मातीतील खेळ असलेली कुस्ती ऑलिम्पिकमध्ये मॅटवर होते. स्व. खाशाबा जाधव यांच्यानंतर २००८ मध्ये सुशीलकुमारने नव्याने सुरू केलेली कुस्तीतील ऑलिम्पिक पदकाची परंपरा योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांनी २०१२ व २०१६ ला कायम ठेवलेली. यावेळी ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती महिला व पुरुष मिळून ७ कुस्तीपटू ऑलिम्पिकला आलेले. मात्र, विनेश फोगटसह चारही महिला कुस्तीपटूंच्या पदरी निराशा पडली.
महिला कुस्तीपटू पराभूत झाल्या म्हणून पुरुष कुस्तीपटूंनी जणूकाही आणखीन त्वेषाने झुंज दिली. साधे मिसरूडही न फुटलेला दीपक पूनिया अखेरच्या सेकंदापर्यंत लढून ब्राँझ मेडलच्या बाउटमध्ये पराभूत झाला. सुशीलकुमारने सुरु केलेली ही परंपरा खंडित होते की काय असे वाटत असतानाच, सुशीलने ज्या छत्रसाल आखाड्यातून सुरुवात केली, त्याच आखाड्यातील दोन रांगडे गडी पुढे आले. रविकुमार दहिया याने सिल्वर तर बजरंग पूनियाने ब्राँझ मेडल आपल्या नावे करत भारताच्या या आपल्या खेळाचा गौरव आणखीच वाढवला.
२०१०-२०१५ या काळात बॅडमिंटनमध्ये ‘चायना वर्सेस सायना’ असा मुकाबला चालायचा. मात्र, आता सायनाची जागा पीव्ही सिंधूने घेतली आहे. २०१६ मध्ये अपूर्ण राहिलेले सुवर्णपदकाचे स्वप्न यावेळी पूर्ण करण्याच्या इराद्याने ती कोर्टवर उतरली होती. मात्र, उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने तिला तो ‘गोल्डन स्मॅश’ मारण्यासाठी आणखी तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. तरीही, ब्राँझ मेडल मॅचमध्ये आपण रिकाम्या हाताने मायदेशी जाणार नाही, हा निश्चय तिने पूर्ण करून दाखवत सलग दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला.
ऑलिम्पिकचा समारोप होण्यासाठी तीन दिवसांचा अवधी शिल्लक असताना भारताच्या काही खेळाडूंनी कमालीचा लक्षणीय खेळ केला. यामध्ये आघाडीवर होते भारताचे पुरुष आणि महिला हॉकी संघ. भारतीय हॉकी चाहते ज्या क्षणाची चातकाप्रमाणे गेल्या ४१ वर्षांपासून वाट पाहत होते तो क्षण मनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वात व ग्रॅहम रीड यांच्या प्रशिक्षणात भारताच्या पुरुष हॉकी संघाने दाखवला. ब्राँझ मेडल मॅचमध्ये बलाढ्य जर्मनीचा ५-४ असा पाडाव करत भारताने ते ऐतिहासिक ब्राँझ मेडल आपल्या नावे केले.
अधिक वाचा – अविस्मरणीय २०२१! यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील ५ खास क्षण, जेव्हा कोट्यवधी भारतीयांची उंचावली मान
भारतीय पुरुष संघाने मेडल मिळवले खरे मात्र सर्व भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या त्या राणी रामपाल यांच्या नेतृत्वातील महिला हॉकी संघाने. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असताना या संघाने ‘चक दे’ चित्रपटालाही लाजवेल अशी कामगिरी करून दाखवली. उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून त्यांनी खळबळ उडवून दिली. मात्र, सेमीफायनल आणि ब्राँझ मेडल मॅच अगदी थोड्या फरकाने गमावल्यामुळे त्यांना विना मेडल परतावे लागले. मात्र, महिला संघाचे कोच असलेले शोएड मराएना हे सर्व भारतीयांसाठी रियल लाइफमधील ‘कबीर खान’ झाले. भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर पुन्हा ‘फिर दिल दो हॉकी को’ असा उद्घोष प्रत्येक गल्लीतून होऊ लागला हे निश्चित.
भारतात फक्त श्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्फला आदिती अशोक या मुलीने खर्या अर्थाने ओळख मिळवून दिली. कोणाच्या ध्यानीमनीही नसताना ती चक्क अखेरच्या शॉटपर्यंत मेडलची दावेदार म्हणून उभी होती. तिच्यामुळे कदाचित भारतीयांनी बोगी, बर्डी यासारखे शब्द प्रथमच गुगलवर सर्च केले. ८-९ वाजेपर्यंत झोपेतून न उठणारे कितीतरी जण केवळ ती मेडल मिळवते का हे पाहण्यासाठी पहाटे चार वाजता उठून टीव्हीसमोर बसत. भारतीयांना या ऑलिम्पिकमध्ये मेडल न मिळाल्याची सर्वात जास्त रुखरुख कोणती लागली असेल तर ती आदिती अशोकच्या या मेडलची म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे पी टी उषाचे हुकलेले ऑलिम्पिक मेडल आजही भारतीयांच्या मनात दुःख निर्माण करते, तसेच काहीसे आदितीच्या बाबतीत घडले.
काही माहित नसलेल्या खेळाडूंनी मेडल आपल्या नावे केली. तर, काही अनुभवी खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. मात्र, मन जिंकणारी कामगिरी केली ती ऍथलिट्सने. स्टीपल चेस प्रकारात महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने सर्वांकडून कौतुक वसूल करणारी कामगिरी केली. रिले संघ चक्क जमैकासारख्या ऍथलेटिक्समध्ये दबदबा असणाऱ्या संघाशी स्पर्धा करताना दिसला. चालण्याच्या स्पर्धांमध्ये देखील प्रथमच भारत कुठेतरी दिसला.
अधिक वाचा – भारतीय गोल्फर अदिती अशोकला ऑलिम्पिकमधील पदकाने हुलकावणी दिली, पण देशासाठी ती इतिहास ठरली
ट्रॅकवर भारताने लक्षवेधी कामगिरी केली तर, फिल्ड प्रकारात इतिहास रचला. युवा महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौर हिने अंतिम फेरीत प्रवेश केलाच शिवाय सहाव्या स्थानापर्यंत देखील मजल मारली. सारा भारत या ऑलिम्पिकमध्ये ज्या स्पर्धेची सर्वात आतुरतेने वाट पाहत होता ती स्पर्धा म्हणजे पुरुष भालाफेक. पात्रता फेरीमध्ये नीरज चोप्रा याने पहिला क्रमांक पटकावत एक ‘न भूतो न भविष्यती’ कामगिरी करून दाखवली होती. अंतिम फेरीत तो याची पुनरावृत्ती करत भारताला ऍथलेटिक्समध्ये पहिले गोल्ड मेडल मिळवून देणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली.
अखेर ७ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस उजाडला. या दिवसाची संध्याकाळ ही कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. नीरज चोप्रा या अवघ्या २३ वर्षाच्या तरण्याबांड पोराने अशी कामगिरी करून दाखवली की, त्याचे मातब्बर प्रतिस्पर्धी त्याच्या आसपासही येऊ शकले नाहीत. आपल्या दुसर्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर भाला फेकत त्याने कोट्यवधी भारतीयांची स्वप्नपूर्ती केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ऍथलेटिक्समधील पहिलेच मेडल आणि तेही गोल्ड हा दुग्धशर्करा योग साजरा झाला.
ज्यावेळी नीरज पोडियमवर मध्यभागी उभे राहून, गळ्यामध्ये चमचमणारे गोल्ड मेडल घालून उभा राहिला होता आणि समोर भारताचे राष्ट्रगीत वाजत असताना सारा भारत आनंदाश्रू ढाळत होता. २०२१ मध्ये नीरज आणि इतरांचे हे निर्भेळ यश भारताच्या क्रीडा क्षेत्रातील उज्वल भविष्याची नांदी होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत विजय मिळवायचे असेल, तर टीम इंडियाला करावा लागेल ‘हा’ बदल, गावसकरांचा सल्ला
नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
सेंच्यूरियन कसोटी फत्ते करत आशियाच नव्हे आशियाबाहेरही चमकली विराटसेना, केला ‘हा’ शानदार किर्तीमान
व्हिडिओ पाहा – अपघाताने भालाफेकीकडे वळला, युट्यूबवरुन प्रशिक्षण घेतले आणि थेट घातली ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी!
https://www.youtube.com/watch?v=zznlIZgUXhk