---Advertisement---

उंच उडीमध्ये भारताला ‘दुहेरी’ यश! मरियप्पणने पटकावले ‘रौप्य’, तर शरदच्या नावे ‘कांस्य’

---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. रविवारी भाविनाबेन पटेलने टेबल टेनिसमध्ये भारतीय संघाला रजत पदक मिळवून देऊन टोकिओ पॅरालिम्पिकमधील भारताच्या पदकांचा श्रीगणेशा केला होता. ज्यानंतर सोमवारी देखील भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यातच आता मंगळवारी (३१ ऑगस्ट) भारताच्या खात्यात आणखी २ पदके सामील झाली.

टी-४२ श्रेणीच्या उंच उडी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या मरियप्पण थंगवेलू आणि शरद कुमार यांनी अनुक्रमे रौप्य पदक आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरले. यासह पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेला पदकांची संख्या १० वर येऊन पोहोचली.

मागील २०१६ च्या रियो पॅरालिम्पिकमध्ये मरियप्पणने सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, यावेळी त्याला रजत पदकावर समाधान मानावे लागले. मरियप्पणने १.८६ मीटर उंच उडी मारली. अमेरिकेच्या सॅम ग्रिवेने आपल्या शेवटच्या प्रयत्नात १.८८ मीटर उडी घेतली. यासह त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केले.

https://twitter.com/Paralympics/status/1432710960477769733

तमिळनाडूचा असलेला मरियप्पण हा केवळ ५ वर्षांचा असताना बसखाली पाय चिरडला गेल्याने त्याच्या उजव्या पायाला कायमचे अपंगत्व आले. मरियप्पणचे कुटुंब अत्यंत गरिबीत वाढले. मरियप्पण लहान असतानाच त्याच्या वडिलांनी त्याच्या परिवाराला सोडून दिले होते. त्यानंतर त्याची आई ठिकाणी मजूर म्हणून काम करू लागली होती. अशा स्थितीतही मरियप्पणच्या आईनेच त्याचा पूर्ण सांभाळ केला. अशा हालाखीच्या परिस्थितीत देखील मरियप्पणने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले यश गाठले.

तर, कांस्य पदक विजेता असलेला शरद हा बिहारचा रहिवासी आहे. तो २ वर्षांचा असताना त्याच्या डाव्या पायाला पोलिओ सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. शरदने टोकिओ पॅरालिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात १.८३ मीटरच्या उडीसह कांस्यपदक आपल्या नावे केले. तसेच शरद हा २ वेळचा आशियाई पॅरा गेम्सचा सुवर्णपदक विजेता आहे.

या दरम्यान वरुण भाटीची मात्र निराशाजनक कामगिरी राहिली. तो तीनही प्रयत्नांमध्ये १.८० मीटरपर्यंतही उडी मारु शकला नाही. त्यामुळे त्याला ७ व्या स्थनावर समाधान मानावे लागले.

तसेच टी-४२ या वर्गीकरणात अशा अथलेट्सचा समावेश असतो. ज्यांना पायाची कमतरता असते किंवा पायातील लांबीमध्ये फरक. तसेच पायाच्या स्नायूंमध्ये अपुरी ताकत किंवा पायांमध्ये संपूर्ण प्रकारचे निष्क्रियपणा असते, असे खेळाडू या श्रेणीमधून खेळतात.

दरम्यान, भारताने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत २ सुवर्ण पदक, ५ रजत पदक आणि ३ कांस्यपदकांसह एकूण १० पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे. भारतीय संघाने आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक पदकं मिळवण्याचा देखील विक्रम प्रस्थापित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
अवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव
एकही दिल कितनी बार जितोगे! ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट
टोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने ‘कांस्यपदका’ला घातली गवसणी

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---