मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत जोरदार विजय मिळवला होता. मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडलेला. हा सामना अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाज पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज अडकले होते. परंतु न्यूझीलंड संघातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी, न्यूझीलंड संघाला ३७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. दरम्यान हा सामना झाल्यानंतर न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम याने न्यूझीलंड संघ कुठे कमी पडला, याबाबत भाष्य केले आहे.
केन विलियमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद टॉम लॅथमला देण्यात आले होते. सामना झाल्यानंतर त्याने म्हटले की, “हे क्रिकेटच्या त्या क्षणांपैकी एक होते, जिथे कुठलीच गोष्ट तुमच्या बाजूने होत नसते. आम्ही जगभरातील संघांसोबत अनेकदा असे केले आहे. दुर्दैवाने हा आमचा वाईट काळ होता. एकही गोष्ट अशी नव्हती जी आम्हाला हवी होती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “रॉस टेलरची रणनिती स्पष्ट होती की, त्याला गोलंदाजांवर आक्रमण करायचं आहे. जेव्हा भारतीय उपखंडातील संघाविरुद्ध अशा रणनीतीचा वापर होतो, त्यावेळी ते चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, रॉस टेलरची ही योजना देखील कामी आली नाही. मला खात्री आहे की, तो याच रणनितीसह मैदानात गेला होता.”
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. या गोलंदाजांचे कौतुक करत टॉम लॅथम म्हणाला की, “तुम्ही या परिस्थितीत त्यांना दबाव बनवण्याची संधी देऊ शकत नाही. ते खरच अप्रतिम होते. ते अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत गेले. ज्यामुळे फलंदाजांना धावा करण्याची संधी मिळत नव्हती. आम्ही त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या क्षेत्ररक्षकांना मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो.”
महत्वाच्या बातम्या :
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विजयाने शेवट, त्यानंतर टीम इंडिया केव्हा खेळणार पुढील सामना? घ्या जाणून
भारतीय संघाचा दिलदारपणा! कानपूर कसोटीनंतर आता वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनाही दिले मोठे बक्षीस