मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटचे सामने होत नसल्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडू सोशल मीडियावर व्यस्त आहेत तर तर काही खेळाडू आपला आवडता संघ निवडून चर्चेत राहत आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर टॉम मूडी यांनी कसोटी, वनडे आणि टी-ट्वेंटी मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू निवडले आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून 8 कसोटी आणि 76 वनडे सामने खेळणारे टॉम मूडी यांनी कसोटींमध्ये दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलीस आणि वेस्ट इंडीजचा गॅरी सोबर्स या दोन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले. मूडी यांच्या मते, या दोघांपैकी एकाची निवड करणे फारच मुश्किल आहे. कॅलिस एक ‘अविश्वसनीय पॅकेज’ आहे. जो फलंदाजीसोबत चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील करून मैदान गाजवू शकतो.
याचबरोबर तिसरा अष्टपैलू खेळाडू म्हणून मूडी यांनी पाकिस्तानच्या इम्रान खान यांना निवडले. मूडी यांच्या मते, इम्रान खान हे स्वतःला झोकून देऊन क्रिकेट खेळायचे. त्यांची बॅटिंग पाहण्यासारखी असायची. खान यांनी पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देऊन निवृत्त झाले. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर ते एक अद्भुत खेळाडू होते.
टी ट्वेंटी मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून मूडी यांनी आंद्रे रसेल, शेन वॉटसन आणि शाहिद आफ्रिदी या तीन खेळाडूंना निवडले. मुडी यांच्या मते, आफ्रिदीने त्याच्या बारा-चौदा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीने जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो एक मॅचविनर खेळाडू आहे.
वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणून जॅक कॅलिस, शेन वॉटसन आणि लान्स क्लुजनर या तिघांना निवडले आहे.
टॉम मुडी यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते क्रिकेट सामन्यात समालोचक भूमिकेत दिसून येतात.