सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारताने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ने गमावली. या मालिकेनंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये १९ जानेवारीपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताचा मर्यादीत षटकांचा नियमित कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना १० नोव्हेंबर १९९१ रोजी कोलकाता येथे खेळला गेला होता. या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २१ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा आगमन केले होते. तेव्हा पहील्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर (७३ चेंडूत ६२ धावा आणि १/२७) आणि ऍलन डोनाल्ड (५/२९) या दोघांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
साल १९९१ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ८४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३५ वेळा पराभूत केले आहे. तर भारताला ४६ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुद्धा भारतीय फलंदाजाच्या नावावर आहे. या लेखात आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊयात.
३. राहुल द्रविड
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज राहुल द्रविडचे नाव आहे. १९९६ ते २००७ पर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३६ सामन्यांमध्ये त्याने ३९.६६ च्या सरासरीने १३०९ धावा केल्या, त्यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्रविडची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ८४ आहे.
२. सौरव गांगुली
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सौरव गांगुली हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९९६ ते २००७ दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०.५० च्या सरासरीने आणि ७६.५५च्या स्ट्राइक रेटने १३१३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३ शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नैरोबी येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी नॉकआउट ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत त्याने १४१ धावसंख्या केली होती.
१. सचिन तेंडुलकर
या यादीत प्रथम क्रमांकावर आहे, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर. तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरने १९९१ ते २०११ पर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण ५७ एकदिवसीय सामने खेळले असुन ३५.७३ च्या सरासरीने आणि ७६.३१च्या स्ट्राइक रटने २००१ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने २४ फेब्रुवारी २०१० रोजी ग्वाल्हेर येथे खेळलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्कृष्ट धावसंख्या २०० केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“तर सांग कोणाची विकेट घेऊ”, युजवेंद्र चहलचा विराट कोहलीसाठी स्पेशल मेसेज
U19 WC: बुधवारी रंगणार भारत-आयर्लंड सामन्याचा थरार, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लढत
विराट आयुष्यात कधीच विसरणार नाही ‘१९ जानेवारी’, आफ्रिकेविरुद्ध मैदानावर उतरताच बनणार खास रेकॉर्ड