---Advertisement---

टी२० क्रिकेटमधील तीन खेळाडू जे चांगल्या कामगिरीनंतरही राहिले प्रसिद्धीपासून दूर, एका भारतीय खेळाडूचाही समावेश

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 6:07 PM
---Advertisement---

टी२० क्रिकेटचा पहिला सामना १७ फेब्रुवारी २००५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. क्रिकेटचे या नव्या स्वरूपाचा प्रेक्षकांनी भरपूर आनंद घेतला होता. त्यानंतर २००७ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद मिळवल्यानंतर या स्वरूपाची लोकप्रियता आणखी वाढली.

ही वाढती लोकप्रियता पाहता २००८ मध्ये भारतात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला होता. या स्पर्धेतून एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुरेश रैना, डेविड वॉर्नर, ख्रिस गेल, कायरन पोलार्ड सारख्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत चाहत्यांच्या मनात घर केले. पण असेही काही खेळाडू आहेत जे वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, मात्र त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. अशा ३ खेळाडूंवर एक नजर टाकूया.

१) माइकल क्लिंगर – माइकल क्लिंगरने २०६ टी२० सामन्यात ३४.४५ च्या सरासरीने ५९६० धावा केल्या. ही आकडेवारी पाहून तो किती अप्रतिम फलंदाजी करायचा याचा अंदाज तुम्हाला येईलच. त्याची फलंदाजी पाहून त्याचे नाव ‘जेविश ब्रॅडमन’ असे देखील ठेवण्यात आले होते. २०१४-१५ मध्ये झालेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत त्याने सर्वाधिक ३२६ धावा केल्या होत्या. आयपीएल २०११ मध्ये झालेल्या लिलावात त्याची कोची टस्कर्स केरला संघात निवड करण्यात आली होती. परंतु, ४ परदेशी खेळाडूंना खेळवण्याच्या नियमामुळे त्याला अंतिम प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान मिळाले नाही.

२) हेनरी डेविड्स – साल २००९ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत केप कोब्राज संघाकडून खेळताना हेनरी डेविड्सने अप्रतिम फलंदाजी केली होती. तसेच हेनरी डेविड्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १८५ टी -२० सामन्यात २३.७३ च्या सरासरीने ३८६९ धावा केल्या आहेत. क्लब लेव्हल क्रिकेटमध्ये त्याने सतत चांगली कामगिरी केली. २०१४-१५ कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होता. त्याने ७ सामन्यात १५६ धावा केल्या होत्या. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की,तो किती चांगला फलंदाज आहे.

३) रजत भाटिया – ३७ वर्षीय गोलंदाज रजत भाटियाकडे भरपूर अनुभव होता. याच अनुभवाचा फायदा घेत तो ७ ते १५ षटकांमध्ये गोलंदाजीला येऊन धावांची गती कमी करायचा. इतकेच नव्हे तर गडी देखील बाद करून द्यायचा. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता होती. ज्यामुळे फलंदाज नेहमी अडचणीत यायचे. त्याने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पुणे आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ९५ सामन्यात ७१ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना त्याने ३४२ धावा केल्या होत्या. त्याचे भारतीय संघासाठी खेळण्याचे स्वप्न होते. परंतु त्याला हे स्वप्न पूर्ण करता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

राहुल द्रविड – भारतीय क्रिकेटचा ‘ध्रुव’ तारा

‘वेल ‘पेड’ इंडिया!’ भारत-अफगानिस्तान सामन्यानंतर ‘फिक्समॅच’ हॅशटॅग होतोय ट्रेंड

पाकिस्तानला पोटशूळ! म्हणे भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स; भारतीय चाहत्यांनी केली तोंडे बंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---