कसोटी क्रिकेट प्रकार रंजक होण्यासाठी आणि प्रेक्षक कसोटी क्रिकेटपासून दूर जाऊ नयेत म्हणून आयसीसीने गेल्या वर्षी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू केली. गेल्या वर्षी दि. १ ऑगस्टपासून आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेस सुरुवात झाली. त्यानंतर एकूण ९ संघ एकमेकांविरूद्ध खेळत आहेत आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी लढत आहेत.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप सुरू झाल्यानंतर खेळाडूंमध्ये चांगली कामगिरी करण्याची लढाई सुरू आहे. यामध्ये बरेच फलंदाज शानदार फलंदाजी करीत धावा काढत आहेत. कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत फलंदाजांमध्ये धावांसह शतकांसाठीही शर्यत सुरू आहे. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप आतापर्यंत २७ फलंदाजांनी किमान १ तरी शतक ठोकली आहेत.
या लेखात कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या ५ फलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे ५ फलंदाज
५. रोहित शर्मा (Rohit Sharma) – ३ शतके
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सलामीवीर रोहित शर्माने गेल्या काही वर्षांत वनडे क्रिकेटमधील उत्तम फलंदाज म्हणून स्वत: ला सिद्ध केले आहे. त्याचबरोबर मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्येही सलामीला शानदार प्रदर्शन केलेे आहे.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानेही आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी केली आहे. या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने ३ शतके ठोकली आहेत. ही तिन्ही शतके त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली आहेत.
४. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) – ३ शतके
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालला संघात संधी मिळाल्यापासून तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सन २०१८ मध्ये मयंकला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम संधी मिळाली. त्यानंतर तो संघात कायम आहे. गेल्या एक वर्षात आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत मयंक अग्रवालची कामगिरी शानदार होत आहे.
यावेळी त्याने केवळ बऱ्याच धावा ठोकल्या नाहीत तर त्याने आपल्या फलंदाजीने ३ शतकेही ठोकली. यातील २ शतके त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर १ शतक बांगलादेश विरुद्ध केले आहे.
३. बाबर आझम (Babar Azam) – ४ शतके
पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा प्रतिभावान फलंदाज बाबर आझम खूप चांगला प्रदर्शन करत आहे. बाबर आझमची आतापर्यंतची कारकीर्द अतिशय नेत्रदीपक ठरली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बाबरने स्वत: ला सिद्ध केल्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळवले.
कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यानंतर तो तिथेही आपली छाप पाडत आहे. गेल्या एक वर्षात आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू झाल्यापासून बाबर आझम सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. यावेळी त्याने आपल्या बॅटने ४ शतके झळकावली आहेत. यातील २ शतके त्याने श्रीलंकेविरुद्ध तर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश विरुद्ध प्रत्येक १ शतक केले आहे. विशेष म्हणजे तो कसोटी चॅम्पियनशिपचे आत्तापर्यंत केवळ ५ सामने खेळला असून यात ४ शतके त्याने झळकावली आहेत.
२. मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) – ४ शतके
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने अॅशेस मालिकेद्वारे आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमधील आपल्या प्रवासाला सुरुवात केली. अॅशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाला जबरदस्त फलंदाजी करणारा एक फलंदाज मिळाला आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून मार्नस लॅब्यूशेन आहे.
स्टीव्हन स्मिथच्या दुखापतीनंतर मार्नसला याला सबस्टिट्युट (बदली खेळाडू) म्हणून संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मार्नसनेही ४ शतके केली आहेत. यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या प्रत्येकी २ शतकांचा समावेश आहे. तसेच मार्नस सध्या कसोटी चॅम्पियनशिमध्ये सर्वाधिक धावाही करणारा फलंदाज आहे.
१. बेन स्टोक्स (Ben Stokes) – ४ शतके
इंग्लंड क्रिकेट संघानेच आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या वर्षी अॅशेस कसोटी मालिकेपासून खेळण्यास सुरुवात केली होती.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत इंग्लंड संघाने आतापर्यंत बऱ्यापैकी कामगिरी बजावली आहे, त्यांच्याकडून स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत बेन स्टोक्सने अफलातून फलंदाजी केली आहे.
स्टोक्सने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक ४ शतके केली आहेत. त्याने यातील २ शतके ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध प्रत्येकी १ शतक केले आहे.
वाचनीय लेख –
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिग्गज असलेले ३ खेळाडू, जे नाही खेळू शकले जास्त कसोटी क्रिकेट
भारताचे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ३ फिरकीपटू, जे खऱ्या अर्थाने ठरले हिरो
५ दिग्गज खेळाडू ज्यांनी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला वर्ल्डकप फायनलमध्ये