१९७१ मध्ये वनडे क्रिकेटला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताला वेगाने खेळण्याची ओळख झाली. जवळजवळ ५० वर्षांचा इतिहास असललेल्या या वनडे क्रिकेटमध्येही गरजेनुसार बदल होत गेले. त्यानुसार हळू-हळू क्रिकेटपटूंनीही त्यानुसार बदल करुन घेतला.
भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारताकडून आत्तापर्यंत अनेक दिग्गज फलंदाज खेळले आहेत, ज्यांनी गोलंदाजांवर नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. तसेच भारतीय क्रिकेटपटूंनी बदलत्या काळानुसार झालेल्या बदलांना स्विकारत खेळात बदल केला. त्यामुळे अनेकदा कसोटीत संयमी खेळ करणारे फलंदाज वनडेत आक्रमक खेळ करतानाही दिसू लागले. तर मुळातच आक्रमक खेळणाऱ्या फलंदाजांसाठी वनडेमुळे मोठी संधी उपलब्ध झाली.
या लेखात आपण अशा ५ फलंदाजांचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी भारताकडून खेळताना वनडेत सर्वात जलद म्हणजेत कमी चेंडूत अर्धशतक केले आहे.
५. युवराज सिंग – २२ चेंडू
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग नेहमीच त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला गेला. त्याने वनडेमध्येही अनेकदा मोठ्या खेळी केल्या आहेत. २०११ चा विश्वचषक भारताला जिंकून देण्यातही युवराजचा मोठा वाटा होता. युवराजच्या अनेक अविस्मरणीय खेळींपैकी एक म्हणजे त्याने २७ डिसेंबर २००४ ला बांगलादेशविरुद्धच्या वनडेत केलेल्या ३२ चेंडूतील ६९ धावांची खेळी.
त्या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले होते. तसेच त्याने त्याचे अर्धशतक केवळ २२ चेंडूत पूर्ण केले होते. त्यामुळे तो वनडेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
त्या सामन्यात भारताने युवराजच्या आक्रमक अर्शतकाबरोबरच विरेंद्र सेहवाग(७०) आणि राहुल द्रविडच्या(६०) अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३४८ धावा करत बांगलादेशला ३४९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २५७ धावाच करता आल्याने भारताने हा सामना ९१ धावांनी जिंकला होता.
४. राहुल द्रविड – २२ चेंडू
नेहमीच संयमी खेळी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचे वनडेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये नाव पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण द्रविडची वनडे कारकिर्दही कसोटी इतकीच बहरलेली आहे. तो वनडेत १० हजारांहून अधिक धावा करणाऱ्या ५ भारतीयांपैकी एक आहे.
त्याने अनेकदा वनडेत महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. त्यातील १५ नोव्हेंबर २००३ ला त्याने हैद्राबाद येथे न्यूझीलंड विरुद्ध केलेली २२ चेंडूतील नाबाद ५० धावांची खेळी अनेकांच्या लक्षात असेल. त्यावेळी द्रविडने ५ चौकार आणि ३ षटकार खेचले होते. त्यामुळे त्याची ही खेळी वनडेत वेगवान अर्धशतकी खेळी करणाऱ्या भारतीयांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
त्याच्या द्रविडच्या तुफानी अर्धशतकी खेळीमुळे आणि सुरुवातीला सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या शतकाच्या जोरावर त्या सामन्यात भारताने ५ बाद ३५३ धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला ३५४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २०८ धावाच करता आल्याने भारताने हा सामना १४५ धावांनी जिंकला होता.
३. विरेंद्र सेहवाग – २२ चेंडू
भारताचा सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग त्याच्या स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने अनेकदा त्याच्या वादळी खेळीने समोरच्या संघाचे खच्चीकरण केले आहे. त्याने वनडेत अशीच एक खेळी २४ ऑक्टोबर २००१ ला केनिया विरुद्ध केली होती. त्यावेळी त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना २३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या होत्या.
त्यावेळी त्याने २२ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. ही खेळी त्याची वनडेत वेगवान अर्धशतकी खेळी करणाऱ्या भारतीयांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्या सामन्यात सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरने शतकी खेळी केल्या होत्या. त्यांच्या शतकांच्या आणि सेहवागच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारताने केनियाविरुद्ध ३ बाद ३५१ धावा केल्या होत्या. त्यावेळी ३५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केनियाला १६५ धावाच करता आल्याने भारत १८६ धावांनी विजयी झाला होता.
२. कपिल देव – २२ चेंडू
भारताच्या पहिल्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव वनडेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कपिल देव यांनी अनेकदा आक्रमक खेळी केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे त्यांनी १९८३ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध एल्बियॉन येथे खेळताना ३८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली होती.
त्यावेळी त्यांनी २२ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होेते. त्यावेळी हे भारताकडून सर्वात जलद अर्धशतक ठरले होते.
त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २८२ धावा करत वेस्ट इंडिजला २८३ धावांचे आव्हान दिले होते. पण वेस्ट इंडिजला ९ बाद २५५ धावाच करता आल्याने भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला होता.
१. अजित अगरकर – २१ चेंडू
भारताकडून आत्तापर्यंत अनेकांनी आक्रमक खेळी केल्या आहेत. पण भारताकडून वनडेत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम मात्र अजित अगरकरच्या नावावर आहे. त्याने १४ डिसेंबर २००० ला झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सामन्यात ७ चौकार आणि ४ षटकारांसह २५ चेंडूत ६७ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने २१ चेंडूत अर्धशतक केले होते.
त्याच्या या आक्रमक अर्धशतकामुळे भारताने त्या सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता. भारताने त्या सामन्यात ५० षटकात ६ बाद ३०१ धावा करत झिम्बाब्वेला ३०२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने सर्वबाद २६२ धावा केल्याने भारतीय संघाने ३९ धावांनी विजय मिळवला होता.
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटमधील हे १० हटके स्टॅट्स आजचा तुमचा दिवस करतील खास, पहा
‘या’ 3 पंचांचे नाव घेतल्यावर आजही कित्येक क्रिकेटप्रेमींच्या तळपायाची आग जाते मस्तकात
आयपीएलमध्ये हॅट्रिक विकेट घेणारे ७ वेगवान गोलंदाज