सन २०२० या वर्षात जगाने करोना विषाणूमुळे ‘न भूतो न भविष्यति’ अशी परिस्थिती पाहिली. या वर्षात अनेक अनपेक्षित गोष्टी लोकांनी अनुभवल्या. क्रिकेट जगतालाही या महामारीचा फटका बसला. टी-२० विश्वचषकासह अनेक महत्त्वाचे सामने यामुळे रद्द करावे लागले. मात्र, आता यातून सावरत हळूहळू सगळंच पूर्वपदावर येत आहे.
मात्र, २०२० साली भारतीय क्रिकेट संघाबाबतही अशा अनपेक्षित गोष्टी घडल्या. कोरोना विषाणूमुळे या वर्षी भारतीय संघाने केवळ ९ वनडे सामने खेळले. मात्र, त्यातील चक्क ६ सामने गमावले. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध वर्षाच्या प्रारंभी मायदेशात खेळविण्यात आलेली मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली. परंतु त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध न्यूझीलंडच्याच भूमीवर ३-०, तर वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौर्यावर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध २-१ असा पराभव पत्करला. बलाढ्य भारतीय संघासाठी हे पराभव धक्कादायक होते.
याशिवाय गेल्या १२ वर्षांत न घडलेली घटना देखील याच वर्षी घडली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या संपूर्ण वर्षात एकही वनडे शतक झळकाविले नाही. असे यापूर्वी फक्त कोहलीच्या पदार्पणाच्या वर्षात म्हणजे २००८ सालीच घडले होते.
अशाच आश्चर्यकारक गोष्टी भारतीय गोलंदाजीच्या बाबतीतही या वर्षी घडल्या. या वर्षातील वनडे सामन्यांत भारताकडून सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चक्क चौथ्या स्थानी आहे. या लेखात आपण बुमराहसह या यादीत असणार्या इतर गोलंदाजांचे देखील आकडे पाहणार आहोत.
५. नवदीप सैनी
वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने या वर्षी ६ वनडे सामने खेळत ४ बळी पटकाविले. या ६ सामन्यांत ५५ षटके टाकतांना सैनीने ९९ च्या सरासरीसह ७.२० च्या धावगतीने एकूण ३९६ धावा दिल्या. मजेशीर बाब म्हणजे भारतीय संघाने या वर्षी खेळलेल्या तीनही मालिकेत सैनीने प्रत्येकी २ सामने खेळले.
४. जसप्रीत बुमराह
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या वर्षातील ९ वनडे सामन्यांत केवळ ५ बळींचीच कमाई करता आली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तर बुमराहला एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. एरवी २५.३३ ची सरासरी राखणार्या बुमराहची सरासरी यावर्षी चक्क ९६.४० इतकी होती. ४३ धावांत २ बळी, ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी होती.
३. कुलदीप यादव
भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव वनडे सामन्यांत भारतीय संघाचा महत्वाचा सदस्य असतो. या वर्षी कुलदीपने खेळलेल्या ५ वनडे सामन्यांत ५३.८३ च्या सरासरीने ६ बळी घेतले. आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या कुलदीपची जादू यावर्षी चालल्याचे दिसले नाही. वर्षाच्या प्रारंभी राजकोट येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांतील ६५ धावांत २ बळी, हे कुलदीपचे या वर्षातील सर्वोत्तम आकडे होते.
२. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर
भारताकडून या वर्षी वनडे सामन्यांत सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांच्या यादीत दुसर्या स्थानावर तीन गोलंदाज आहेत. लेगस्पिनर युझवेंद्र चहल, डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी ७ बळी घेतले आहेत. चहलने ४ सामने खेळतांना ३७.८५ च्या सरासरीने ७ बळी घेतले तर जडेजाने ९ सामन्यांत ६७.४२ च्या सरासरीने ७ बळी पटकाविले. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने ५ सामन्यांत ४५.८५ च्या सरासरीने ७ गडी बाद केले.
१. मोहम्मद शमी
सन २०२० साली भारतीय संघातर्फे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वनडे सामन्यांत सर्वाधिक बळींची कमाई केली. शमीने यावर्षी केवळ ६ सामने खेळले, मात्र त्यात त्याने ३२.७५ च्या सरासरीने सर्वाधिक म्हणजे १२ बळी पटकाविले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगलोरला झालेल्या वनडे सामन्यात त्याने ६३ धावांत घेतलेले ४ बळी, ही ह्या वर्षातील भारतीय गोलंदाजांतर्फे नोंदवलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. शमीसाठी विशेष बाब म्हणजे २०१९ साली देखील तो भारतासाठी वनडे सामन्यांत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती त्याने या वर्षीही केली आहे.
ट्रेंडिंग लेख-
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव
रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी लागू शकते ‘या’ तीन दिग्गजांची वर्णी
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी