भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी (Rohit Sharma) २०२१ वर्ष धमाकेदार होतं. रोहितने यावेळी अनेकदा चांगल्या खेळी करून संघाला विजय मिळवून दिले. रोहित विस्फोटक फलंदाजी करतो आणि म्हणून त्याने स्वतःची ‘हिटमॅन’ (Hitman) म्हणून ओळख बनवली आहे. तो लयीत असताना गोलंदाजांचं काही खरं नसतं.
आता तर रोहितकडे भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचं नेतृत्त्वपद आले आहे. तसेच तो कसोटी संघाचाही उपकर्णधार झाला आहे. त्यामुळे अनेक अर्थांनी रोहितसाठी वैयक्तिकरित्या २०२१ वर्ष सुखकारक ठरलं आहे. या लेखातही आपण रोहितने २०२१ साली केलेल्या ५ विशेष खेळींकडे नजर टाकू.
१. ४७ चेंडूत ७४ धावा, भारत विरुद्ध अफगाणिस्तान, टी-२० विश्वचषक २०२१ (T20 World Cup 2021)
टी-२० विश्वचषकात भारतीय संघ चांगली सुरुवात करू शकला नाही. पहिल्या २ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उपांत्यफेरीत भारतीय संघ पोहचू शकला नाही. पण भारताने उरलेल्या ३ सामन्यात दणदणीत विजय प्राप्त केले. ज्यात रोहित शर्माने उत्कृष्ट प्रदर्शन केले. अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या सलामीवीरांनी म्हणजेच केएल राहुल आणि रोहित शर्माने गोलंदाजांची खूप धुलाई केली. रोहितने ४७ चेंडूत ७४ धावा केल्या. ज्यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेटसुद्धा १५७.४५ होता. अफगाणिस्तान ४४ धावांनी सामना हरला आणि रोहितला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
२. ३४ चेंडूत ६४ धावा, भारत विरुद्ध इंग्लंड, इंग्लंडचा भारत दौरा, २०२१ (England Tour Of India 2021)
इंग्लंड संघ फेब्रुवारी मध्ये कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत होती. पाचव्या टी२० सामन्यात भारत प्रथम फलंदाजीला आला. आणि रोहित-विराटच्या जोडीने धावांचा रतीब घातला. दोघांनी फटकेबाजी करत पॉवरप्लेचा बरोबर वापर करून घेतला. रोहितने १८८.२४ च्या स्ट्राईक रेटने ३४ चेंडूत ६४ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याच्यासोबत विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) होता. त्याने ५२ चेंडूत ८० धावा केल्या. यामुळे भारत २२४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंड १८८ धावाच करू शकला. ही यावर्षीची रोहितची उत्कृष्ट खेळी होती.
३. १४५ चेंडूत ८३ धावा, इंग्लंड विरुद्ध भारत, भारताचा इंग्लंड दौरा, २०२१ (India Tour Of England 2021)
भारताच्या इंग्लंड दौऱ्यात सर्वांचं लक्ष भारतीय सलामी फलंदाजांवर होतं. कारण भारतीय सलामी फलंदाज परदेशात चांगली भागीदारी नाही करू शकले नव्हते. पण रोहित आणि राहुलने यावेळी उत्कृष्ट फलंदाजी केली. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताने लॉर्ड्समध्ये फलंदाजी करताना खूप चांगली सुरुवात केली. केएल राहुलने (KL Rahul) २५० चेंडूत १२९ धावा, तर रोहितने १४५ चेंडूत ८३ धावा केल्या. रोहित आपलं परदेशातलं पहिलं शतक करू पाहत होता, पण जेम्स अँडरसनने त्याला त्रिफळाचित केले.
४. २३१ चेंडूत १६१ धावा, भारत विरुद्ध इंग्लंड, इंग्लंडचा भारत दौरा, २०२१
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पुनरागमन केलं. रोहित शर्माने चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवर शतक ठोकलं. त्याने २३१ चेंडूत १८ चौकार आणि २ षटकारांसह १६१ धावा केल्या. त्यासोबतच रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेसोबत चांगली भागीदारी केली. रविचंद्रन अश्विनसमोर (Ravichandran Ashwin) इंग्लंड संघाने लोटांगण घातलं आणि भारताने ३१७ धावांनी जिंकला. हा सामना रोहित आणि अश्विनसाठी खास होता.
५. २५६ चेंडूत १२७ धावा, इंग्लंड विरुद्ध भारत, भारताचा इंग्लंड दौरा, २०२१
रोहितने इंग्लंडमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलं. चौथा कसोटी सामना केनिंगटन ओव्हलवर खेळवण्यात आला. भारत १९१ वर पहिल्या डावांत सर्वबाद झाला. इंग्लंडने पहिल्या डावांत २९० धावा करून १०१ धावांची आघाडी घेतली होती. पण रोहितने दुसऱ्या डावात २५६ चेंडूत १२७ धावा करत संघाला वाचवलं. त्या शतकाच्या जोरावर भारत ४६६ धावा करू शकला. इंग्लंड दुसऱ्या डावांत २१० धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांनी १५७ धावांनी पराभव पत्करला.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीर आता दिसणार मेंटॉरच्या भूमीकेत, ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी
रुटचा २०२१ वर्षात डंका! विव रिचर्ड्स, ग्रॅमी स्मिथ सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
विराट विरुद्ध गांगुली वादाचे पडसाद सोशल मीडियावरही, #WorldStandsWithKohli हॅशटॅग ट्रेंड