---Advertisement---

एका वर्षात सर्वाधिक वनडे धावा करणारे ५ खेळाडू

On: शनिवार, एप्रिल 11, 2020 4:57 PM
---Advertisement---

वनडे क्रिकेट सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत २६११ खेळाडू खेळले आहेत. यातील अनेक क्रिकेटपटूंनी अनेक अविश्वसनीय विक्रम केले आहेत. त्यातील एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ५ खेळाडूंना आपण या लेखात आढावा घेणार आहे.

वनडेमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज – 

५. मॅथ्यू हेडन – १६०१ धावा (२००७)

२००७ हे वर्ष ऑस्ट्रेलियासाठी खास ठरले होते. त्यावर्षी त्यांनी सलग तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या विश्वचषकात मॅथ्यू हेडनचा फॉर्म महत्त्वाचा ठरला होता. त्याने त्यावर्षी ३२ वनडे सामन्यात ५ शतके आणि ६ अर्धशतकांसह ५९.२९ च्या सरासरीने १६०१ धावा केल्या होत्या. तो वनडेमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

तसेच त्याने त्यावर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध हेमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध नाबाद १८१ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळीही केली होती. तसेच त्याचवर्षी झालेल्या विश्वचषकात त्याने लागोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ चेंडूत १०१ धावांची आणि वेस्ट इंडिज विरुद्ध १४३ चेंडूत १५८ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच त्याने त्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धही शतक केले होते.

४. सचिन तेंडुलकर – १६११ धावा (१९९६)

भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९६ ला ३२ वनडे सामन्यात ५३.७० च्या सरासरीने ६ शतके आणि ९ अर्धशतकांसह १६११ धावा केल्या होत्या. यावर्षी केलेल्या त्याच्या १६११ धावा वनडेत एकावर्षात केलेल्या चौथ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा आहेत.

त्यावर्षी विश्वचषक झाला होता. त्या विश्वचषकात सचिनने शानदार कामगिरी केली होती. त्याने त्या विश्वचषकात सर्वाधिक ५२३ धावा केल्या होत्या. त्यात २ शतकांचा आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. ही दोन शतके त्याने केनिया आणि श्रीलंकेविरुद्ध केली होती. तसेच त्यावर्षी विश्वचषकानंतर त्याने पाकिस्तान विरुद्ध २ आणि दक्षिण आफ्रिका, श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी १ शतक केले होते.

३. राहुल द्रविड – १७६१ धावा (१९९९)

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड १९९९ ला तुफान फॉर्ममध्ये होता. त्याने त्या वर्षात ६ शतके आणि ८ अर्धशतकांसह ४३ सामन्यात ४६.३४ च्या सरासरीने १७६१ धावा केल्या होत्या. त्यामुळे तो वनडेत एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

त्यावर्षी त्याने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीबरोबर ३०० पेक्षा अधिक धावांची भागीदारीही केली होती. तेव्हा तो वनडेत ३०० पेक्षा अधिक धावांच्या भागीदारीमध्ये २ वेळा सहभागी असणारा एकमेक क्रिकेटपटू ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने १९९९ ला झालेल्या विश्वचषकातही सर्वाधिक ४६१ धावा केल्या होत्या. त्या विश्वचषकात त्याने केनिया आणि श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली होती.

२. सौरव गांगुली – १७६७ धावा (१९९९)

जसे द्रविडसाठी १९९९ हे वर्ष खास ठरले होते, त्याचप्रमाणे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसाठीही ते वर्ष खास ठरले होते. तो १९९९ मध्ये सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज होता. त्याने त्यावर्षी ४१ वनडे सामन्यात ४६.५० च्या सरासरीने १७६७ धावा केल्या होत्या.

त्याच्या या धावा वनडेतील एकावर्षात केलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत. यामध्ये ४ शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश होता.

त्याचवर्षी त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च १८३ धावांची खेळी श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकात केली होती. त्यावेळी त्याने द्रविडबरोबर ३१८ धावांची भागीदारीही केली होती. ही वनडेतील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावांची भागीदारी आहे. एवढेच नाही तर त्यावर्षी त्याने ४ विकेट्ही घेतले होते.

१. सचिन तेंडूलकर – १८९४ धावा (१९९८)

वनडेमध्ये एका वर्षात सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने १९९८ ला ३४ वनडेत ६५.३१ च्या सरासरीने १८९४ धावा केल्या होत्या. त्यावर्षी त्याने ९ शतके आणि ७ अर्धशतके केली होती. त्याचवर्षी सचिनने शारजामध्ये केलेल्या खेळी प्रसिद्ध आहेत.

त्याने कोको कोला कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९ चौकार आणि ५ षटकारांसह १४३ धावांची खेळी त्याचवर्षी केली होती. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यावर्षी सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच उपांत्यपूर्व सामन्यात १२८ चेंडूत १४१ धावांची खेळी केली होती.

सचिनने त्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४ शतके, झिम्बाब्वे विरुद्ध ३ शतके आणि केनिया, श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी १ शतक केली होते. सचिनचे नाव वनडेत एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पहिल्या ५ फलंदाजांमध्ये २ वेळा आले आहे. त्याने १९९६ ला केलेल्या १६११ या धावा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

घरच्यांना त्रास द्यायचा म्हणून या क्रिकेटरला लहानपणी ठेवयाचे झोपाळ्याला बांधून

भारताकडून वनडे पदार्पणातचं दणक्यात सुरुवात करणारे ५ फलंदाज

२००८ आयपीएलमधील पहिले ५ महागडे खेळाडू सध्या करतायत तरी काय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---