जेव्हाही मोठ्या स्पर्धांचा विषय निघतो, तेव्हा फलंदाजांची चर्चा तर होतेच, पण त्यांच्यानंतर दुसरी सर्वात जास्त चर्चा कुणाची होत असेल, तर ती म्हणजे गोलंदाजांची. सध्या विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. तसेच, आता 4 संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. अशात स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांची नावेही समोर आली आहेत. जिथे सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 फलंदाजांच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे, तिथे गोलंदाजांच्या यादीत फक्त एकच भारतीय आहे. चला तर, सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज कोण आहेत, पाहूयात…
विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज
1. ऍडम झम्पा
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतील अव्वलस्थान कुठल्याही वेगवान नाही, तर फिरकी गोलंदाजाने पटकावले आहे. तो गोलंदाज इतर कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू ऍडम झम्पा (Adam Zampa) आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 5.26च्या इकॉनॉमीने सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 3 वेळा एका डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 8 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
2. दिलशान मदुशंका
श्रीलंका संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असले, तरीही त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) याने कमाल केली आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 6.70च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने स्पर्धेत डावात 1 वेळा 4 विकेट्स आणि 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. 80 धावा खर्चून 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
3. जेराल्ड कोएट्जी
दक्षिण आफ्रिका संघ या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. यामागील कारण म्हणजे त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज होय. संघाचा गोलंदाज जेराल्ड कोएट्जी (Gerald Coetzee) याने फक्त 7 सामन्यात गोलंदाजी केली आहे, पण तो या सामन्यांमध्ये 6.40च्या इकॉनॉमीने 18 विकेट्स घेत यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 1 वेळा डावात 4 विकेट्स घेतल्या आहेत. 44 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील शानदार कामगिरी आहे.
4. शाहीन आफ्रिदी
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने पाकिस्तान संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 5.93च्या इकॉनॉमी रेटने 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 1 वेळा डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 54 धावा खर्चून 5 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
5. जसप्रीत बुमराह
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील हुकमी एक्का जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हादेखील या यादीत सामील आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 3.65 या शानदार इकॉनॉमी रेटने 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 1 वेळा डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे. तसेच, 39 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. (top 5 players who takes most wickets in cwc 2023)
हेही वाचा-
Top 5: सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराटचे वर्चस्व, यादीत रोहितही सामील; सगळेच खेळणार Semi Final
फुल टाईम बॉलर नाही, पण बॉलिंग कशी करायची विसरला नाही रोहित; एक दशकानंतर काढला फलंदाजाचा काटा