भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान होणाऱ्या पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जून म्हणजे आजपासून सुरू होत आहे. त्यासाठी काही तासांचाच अवधी शिल्लक असून क्रिकेट रसिकांचे लक्ष या सामन्याकडे लागून आहे. इंग्लंडच्या साऊथटम्पन स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात ‘नाणेफेक’ ही अत्यंत महत्वाची गोष्ट ठरणार आहे. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 5 कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी जेव्हा जेव्हा विराट नाणेफेक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, तो प्रत्येक सामना भारताने जिंकला आहे.
विराट कोहली आतापर्यंत 91 कसोटी सामने खेळला आहे. त्यातील 60 सामन्यांत त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 36 सामन्यांत भारतीय संघाला विजय मिळालेला आहे. या 60 सामान्यांपैकी 27 सामन्यांत विराटने नाणेफेक जिंकली आहे आणि 33 वेळा निकाल त्याच्याविरुद्ध बाजूने (नाणेफेक गमावली) लागला आहे. यामध्ये नाणेफेक जिंकलेल्या सामन्यांतील 22 सामन्यांत त्याने विजय प्राप्त केला आहे; तर फक्त 5 वेळा त्याला अपयश आले आहे. त्याचवेळी नाणेफेक हरण्याच्या परिस्थितीत भारतीय संघाला 14 सामन्यांत विजय मिळाला असून 19 वेळा पराभव स्विकारावा लागला आहे.
एकट्या न्यूझीलंड संघाविरुद्ध बोलायचे झाले तर, विराट आणि केन विलियम्सन कसोटीत पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात विराटने न्यूझीलंडविरुद्ध तीन वेळा नाणेफेक जिंकली असून त्या तिन्ही सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडचा पराभव केला आहे. उर्वरित दोन कसोटी सामने हे न्यूझीलंडच्या भूमीत झाले असून त्या दोन्ही सामन्यांत नाणेफेकीचा निर्णय त्याच्याविरुद्ध लागला आहे आणि त्या दोन्ही कसोटीत भारताचा पराभव झाला आहे.
विराटच्या ‘आक्रमक’ आणि केनच्या ‘कूल’ नेतृत्वात लढत-
विराट कोहली जरी कर्णधार म्हणून यशस्वी असला तरी आयसीसी चषक जिंकण्याच्या बाबतीत त्याची महेंद्रसिंग धोनीसोबत तुलना होऊ शकत नाही. कारण अद्याप कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे या पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर नाव कोरून आपला डंका वाजवण्याची संधी विराट कोहलीकडे आहे. या ऐतिहासिक सामन्यात विराटच्या आक्रमक नेतृत्वाची लढत केनच्या शांत नेतृत्वासोबत होईल.
भारतात यशाचे एकक म्हणून ‘आयसीसी चषक’ ओळखला जातो आणि विश्वचषक जिंकून देण्याऱ्या धोनीला जसा सन्मान मिळाला त्याची नक्कीच उणीव विराटला भासत असेल. त्यामुळे या अंतिम सामन्यात तो ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे केन विलीयम्सनजवळ प्रतिभाशाली आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे प्रेम लाभलेल्या खेळाडूंची फौज आहे. भलेही ते भारताविरुद्ध खेळत असले तरीही विलीयम्सनचा कव्हर ड्राईव्ह, नवख्या डेवॉन कॉन्वेची आक्रमक फलंदाजी आणि ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजीचे कौतुक करण्याऱ्यांची कमी नाही. 2019च्या विश्वचषकानंतर क्वचितच कोणी असेल की जो त्यांचा प्रशंसक नसेल.
या सामन्यात असे अनेक खेळाडू आहेत जे आतापर्यंत एकही विश्वचषक जिंकू शकले नाहीत. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी विश्वचषकापेक्षा कमी नसेल. निल वॅग्नरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करायला चेतेशअवर पुजाराचे अस्त्र तयार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आपली लय इथेही कायम ठेऊ इच्छित असेल. आर अश्विन आपल्या कॅरम बॉल किंवा स्लायडर चेंडूने विलीयम्सन, टेलर किंवा हेन्री निकोलसला संकटात टाकेल तर अनुभवी इशांत शर्मा हा किताब जिंकण्यासाठी आतुर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-न्यूझीलंड WTC फायनल १४४ वर्षांच्या इतिहासातील ‘सर्वात मोठा सामना’, वाचा यामागची कारणे
कर्णधार कोहलीची ‘खरी कसोटी’, १४ वर्षांत पहिल्यांदाच भारत धोनीशिवाय खेळणार आयसीसी स्पर्धेची फायनल
‘भारत सर्वश्रेष्ठ संघ, आम्हाला विजयाचा दावेदार म्हणू नका,’ केन विलियम्सनची प्रामाणिक कबुली






