शुक्रवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 159 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. पहिल्या डावात दोन्ही संघ 200 धावांच्या आतच सर्वबाद झाले होते पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 300 पेक्षा जास्त धावा करून आपला विजय निश्चित केला होता. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. सामन्याचा निकाल बदलण्यात त्याच्या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
ट्रॅव्हिस हेडने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन अर्धशतके झळकावून मोठी कामगिरी केली आहे. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) 10 सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅव्हिस हेडची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तो या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. त्याच्या पुढे स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा आहेत. ट्रॅव्हिस हेडने 50 सामन्यांमध्ये 3199 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने आठ शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत.
ट्रॅव्हिस हेड हा जो रूट, मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ नंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारणारा चौथा फलंदाज बनला आहे. या खेळाडूंनी चॅम्पियनशिपमध्ये 400 हून अधिक चौकार मारले आहेत. जो रूटने 119 डावांमध्ये 576चौकार मारले आहेत. स्मिथने 476 आणि लाबुशेनने 443 , तर हेडने 83 डावांमध्ये 401 चौकार मारले आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 180 धावा केल्या. ज्यात जेडेन सील्सने 5 बळी घेत वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात दिली पण फलंदाज त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत आणि विंडीजचा डाव फक्त 190 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजला 10 धावांची आघाडी मिळाली. तथापि, दुसऱ्या डावात, ट्रॅव्हिस हेड, वेबस्टर आणि अॅलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 310 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 301 धावांचे लक्ष्य दिले. तथापि, वेस्ट इंडिज संघ फक्त 141 धावाच करू शकला.






