इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एका खास विक्रमला गवसणी घातली आहे.
बोल्टने पॉवरप्लेमध्ये दोन षटकांत घेतले 2 बळी
या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट डावाचे पहिलेच षटक फेकायला आला. पहिल्याच चेंडूवर त्याने दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसला तंबूत पाठवले. त्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकात तो परत गोलंदाजी करायला आला. दिल्लीचा अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे तंबूत धाडले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहणे फटका खेळण्याचा प्रयत्नात झेलबाद झाला आणि बोल्टने त्याच्या दोन षटकांत 2 गडी बाद केले.
हंगामात पॉवरप्लेमध्ये 16 बळी घेऊन मिशेल जॉन्सनच्या विक्रमाची केली बरोबरी
या सामन्यात 2 बळी घेऊन ट्रेंट बोल्टने या हंगामात पॉवरप्लेमध्ये एकूण 16 बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करून त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनची बरोबरी केली आहे. जॉन्सनने सन 2013 च्या आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 16 बळी घेतले होते.
पॉवरप्लेमध्ये एका हंगामात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
ट्रेंट बोल्ट – 16 बळी (सन 2020)
मिशेल जॉन्सन – 16 बळी (सन 2013)
दीपक चाहर – 15 बळी (सन 2019)
मोहित शर्मा – 15 बळी (सन 2013)
धवल कुलकर्णी – 14 बळी (सन 2016)
उमेश यादव – 14 बळी (सन 2018)