द हंड्रेड वुमेन्स क्रिकेट लीग स्पर्धेतील ७ वा सामना नॉर्दन सुपरचार्जर्स विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स या संघांमध्ये पार पडला. या सामन्यात नॉर्दन सुपरचार्जर्स संघाने २७ धावांनी विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार ठरली ती भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स. तिने तुफानी अर्धशतकी खेळी करत नॉर्दन सुपरचार्जर्स संघाला १०० चेंडूअखेर १४९ धावांपर्यंत पोहचवण्यात मोलाचे योगदान दिले.
या सामन्यात नॉर्दन सुपरचार्जर्स संघाची कर्णधार विनफिल्ड हिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या संघाला प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात मिळाली होती. विनफिल्ड आणि जेमिमा रॉड्रिग्स या सलामी फलंदाजांनी पहिल्या गड्यासाठी ५४ चेंडुंमध्ये ६४ धावांची भागीदारी केली होती. तर कर्णधार विनफिल्ड हीने २९ चेंडुंमध्ये ३३ धावा केल्या होत्या.(Trent rockets vs northern superchargers match report)
जेमिमा रॉड्रिग्सची ६० धावांची तुफानी खेळी
जेमिमा रॉड्रिग्सने तिसऱ्या गड्यासाठी लॉरा किमिंससोबत मिळून ६४ धावांची भागीदारी केली होती. तिने अवघ्या ४१ चेंडुंमध्ये १० चौकारांच्या साहाय्याने ६० धावांची तुफानी खेळी केली होती. अर्थात तिने ४० धावा तर फक्त चौकारांच्या मदतीने काढल्या आहेत. तर किमिंसने १३ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या होत्या. २० षटक अखेर नॉर्दन सुपरचार्जर्स संघाला १४९ धावा करण्यात यश आले होते. विशेष म्हणजे, यापुर्वीच्या सामन्यातही तिने नाबाद ९२ धावा चोपल्या होत्या.
ट्रेंट रॉकेट्स संघाचा पराभव
धावांचा पाठलाग कडण्यासाठी आलेल्या ट्रेंट रॉकेट्स संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही .अवघ्या ५ धावांवर त्यांचा पहिला गडी तंबूत परतला होता. त्यानंतर नताली सिवरने २३ चेंडूत ६ चौकारांच्या साहाय्याने ३३ धावा केल्या. तर कॅथरिन ब्रंटने ३६ चेंडूत ४ चौकरांच्या साहाय्याने ४३ धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हा सामना नॉर्दन सुपरचार्जर्स संघाने २७ धावांनी आपल्या नावावर केला.
या विजयासह नॉर्दन सुपरचार्जर्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर ट्रेंट रॉकेट्स संघ २ सामन्यात सलग २ पराभवांसह शेवटच्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला टी२० पदार्पणात आपल्या आदर्श खेळाडूकडून मिळाले ‘स्पेशल गिफ्ट’
क्षेत्ररक्षणाची व्याख्याच बदलणारा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक; एकाच सामन्यात घेतले होते ५ झेल
‘मला धवनच्या नेतृत्त्वात धोनीची झलक दिसते,’ पाहा कोणी केलीय गब्बरची स्तुती