खेळाडू हा भारतीय संघाचा असो किंवा दुसऱ्या कोणत्याही अन्य क्रिकेट संघाचा, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते, विश्वचषकामध्ये खेळणे आणि ते जिंकणे. भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.
असेही काही खेळाडू आहेत जे दोन किंवा त्यापेक्षा जास्त विश्वचषकात खेळले आहेत. काही खेळाडू विश्वचषकात खेळले, पण त्यांना अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळाले नाही. एका खेळाडूसाठी यापेक्षा मोठं काहीच नसतं, जेव्हा तो विश्वचषक आपल्या हातात घेऊन उंचावतो. तसं पाहिलं, तर सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) हे स्वप्न त्याच्या कारकीर्दीतील अंतिम विश्वचषकात म्हणजेच २०११ विश्वचषक जिंकून पूर्ण झाले होते.
भारताने आत्तापर्यंत दोन वेळा (१९८३आणि २०११) विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच २००३ ला भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. पण भारतीय संघाला त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करून उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं होतं.
भारताने २००७चा टी२० विश्वचषक जिंकण्याचाही बहुमान मिळवला आहे. पण या विजयामागे कोणत्या ना कोणत्या खेळाडूचा महत्वाचा वाटा असतो. तसं तर सर्व संघाचाच असतो. पण असेही एक दोन खेळाडू असतात ज्यांचं प्रदर्शन संपूर्ण मालिकेत सर्वांपेक्षा चांगलं असतं.
अशाच त्या दोन भारतीय खेळाडूंचा आढावा आज आपण लेखात घेणार आहोत, ज्यांनी विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळविला होता.
सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर त्याचे विक्रम आणि काही अविस्मरणीय खेळी उभ्या राहतात. सचिनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण ६ विश्वचषक खेळले आहेत.
पण २००३ साली दक्षिण आफ्रिकेत खेळला गेलेला विश्वचषक त्याच्यासाठी खास राहिला होता. त्यात त्याने ११ सामने खेळून ६७३ धावा करत २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, भारताला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांपर्यंत पोहचवले होते. पण अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. सचिनच्या त्या प्रदर्शनासाठी त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं होतं. त्याच्या याच प्रदर्शनामुळे या यादीत त्याचं नाव पहिलं येतं.
युवराज सिंग
तब्बल २८ वर्षानंतर २०११ चा विश्वचषक भारताने जिंकला होता. त्यामध्ये युवराज सिंगने (Yuvraj Singh) महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याने या विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करत ३६२ धावा करून १५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचं विश्वचषक जिंकण्याच स्वप्न पूर्ण झालं होतं. आणि त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले होते.
गोल्डन बॅटचे मानकरी
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅटने सन्मानित करण्यात येते. भारताच्या सचिन तेंडूलकर (१९९६ व २००३), राहुल द्रविड (१९९९) आणि रोहित शर्मा (२०१९) यांना आजपर्यंत गोल्डन बॅटने सन्मानित करण्यात आले आहे.