क्रिकेटविश्वात अनेक स्फोटक आणि आक्रमक फलंदाज होऊन गेले आहेत, जे आपल्या बेधडक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. परिस्थितीला किंवा गोलंदाजांना न घाबरता आपल्याच शैलीने फलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात. मग अगदी शतकाच्या जवळ आले असतांना देखील निडरपणे ते षटकार मारून शतक पूर्ण करतात. भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग अशाच फलंदाजांपैकी एक फलंदाज.
मात्र सेहवाग व्यतिरिक्त असे भारताचे अजून दोन खेळाडू आहेत ज्यांनी षटकार मारून आपले शतक पूर्ण केले आहे. या दोन्ही फलंदाजांनी ज्या ज्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवले त्या त्या वेळी त्यांनी षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे हे दोन खेळाडू सख्खे भाऊ आहेत. हे खेळाडू म्हणजे इरफान पठाण आणि युसूफ पठाण.
इरफान पठाणचे कसोटी क्रिकेटमध्ये शतक
डावखुरी वेगवान गोलंदाजी आणि डावखुरी फलंदाजी करणार्या इरफान पठाणने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ एकमेव शतक झळकवले. कसोटी सामन्यात त्याने हे शतक झळकवले आहे. मात्र हे शतक त्याने षटकार मारून पूर्ण करण्याची किमया केली होती. साल २००७ मध्ये पाकिस्तान विरूद्ध बंगलोर येथील कसोटी सामन्यात इरफानने हा कारनामा केला होता. या सामन्यात इरफान पठाण ९६ धावांवर फलंदाजी करत असतांना पाकिस्तानचा फिरकीपटू दानिश कनेरिया गोलंदाजी करत होता. त्याला षटकार मारत इरफानने आपल्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले.
युसूफ पठाणने दोनदा केला कारनामा
युसूफ पठाणने मोठा भाऊ इरफानपेक्षा सवाई कारनामा करत षटकार मारून शतक पूर्ण करण्याचा कारनामा एकदा नाहीतर दोनदा केला. युसूफ पठाणने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन शतके झळकावली असून या दोन्ही वेळी त्याने षटकार मारून शतकाला गवसणी घातली आहे. त्याचे पहिले शतक २०१० साली बंगलोर मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामना खेळतांना साकारले गेले. या सामन्यात त्याने नाबाद १२३ धावांची खेळी केली होती. त्यावेळी ९८ धावांवर असतांना युसूफने किवी गोलंदाजा एंडी मॅकॉयला षटकार मारत शतक पूर्ण केले.
यानंतर युसूफने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक २०११ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंचुरियनच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या वनडे सामन्यात झळकवले होते. या सामन्यात त्याने आक्रमक शतक ठोकताना अवघ्या ७० चेंडूत १०५ धावांची खेळी साकारली होती. या सामन्यात त्याने ९५ धावांवर खेळत असतांना गगनचुंबी षटकार मारला आणि कारकिर्दीतील दुसरे शतकही षटकाराने पूर्ण केले. त्याच्या या कामगिरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळी शतके षटकाराने पूर्ण करणारी इरफान आणि युसूफ ही पहिली भावंड ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीची मोठी घोषणा, वनडे-टी२० विश्वचषक संघाच्या संख्येत वाढ; चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल झाला हा निर्णय
गेल, पोलार्डची फटकेबाजी अन् बोल्ट, जेमिसनचा भेदक मारा; ‘या’ संघांचे खेळाडू उर्वरित आयपीएलला मुकणार
सचिन तेंडुलकरला सर्वाधिक अडचणीत आणणारा गोलंदाज, विमान अपघातात झाला होता दुर्दैवी मृत्यू