रविवारी (7 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 21व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊनं गुजरातवर 33 धावांनी शानदार विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
झालं असं की, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला खेळताना पाहण्यासाठी त्याचे दोन छोटे चाहते चक्क 12 हजार किलोमीटरचा प्रवास करून आले होते! हे दोन्ही मुलं एकना स्टेडियमवर हातात पोस्टर घेऊन शुबमल गिलला सपोर्ट करताना दिसले.
या पोस्टरवर लिहिलं होतं, “आम्ही न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च येथून सुमारे 12 हजार किलोमीटर अंतर पार करून आलो आहोत. आम्हाला शुबमन गिल आणि केन विल्यमसन यांची फलंदाजी पाहायची आहे. याशिवाय मॅचनंतर आम्हाला त्यांना भेटायचही आहे.” हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. युझर्स फोटोवर सातत्यानं कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Gill & Williamson fans from New Zealand to watch them play together 🫡 pic.twitter.com/w396KWjVkn
— Johns. (@CricCrazyJohns) April 7, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊच्या संघानं निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरातची टीम 18.5 षटकांत 130 धावांवर ऑलआऊट झाली.
लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसनं शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. त्यानं 43 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 58 धावा केल्या. निकोलस पूरननं 22 चेंडूत 32 आणि कर्णधार केएल राहुलनं 31 चेंडूत 33 धावांचं योगदान दिलं. गुजरातकडून उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा एकही फलंदाजी मोठी खेळी खेळू शकला नाही. साई सुदर्शननं 23 चेंडूत सर्वाधिक 31 धावा केल्या. तर राहुल तेवतियानं 25 चेंडूत 30 धावा केल्या. लखनऊकडून यश ठाकूरनं धारदार गोलंदाजी करत 5 गडी बाद केले. तो आयपीएलच्या या हंगामात 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षर पटेलचा अशक्यप्राय झेल! इशान किशनचा विश्वासच बसेना; पाहा VIDEO
यश ठाकूर-क्रुणाल पांड्याचा जलवा! लखनऊचा गुजरातवर शानदार विजय
हार्दिक पांड्यानं अखेर विजयाची चव चाखली! दिल्लीचा 29 धावांनी पराभव