हार्दिक पांड्यानं अखेर विजयाची चव चाखली! दिल्लीचा 29 धावांनी पराभव

इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर रविवारी (7 एप्रिल) झालेल्या या सामन्यात दिल्लीसमोर विजयासाठी 235 धावांचं लक्ष्य होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला निर्धारित 20 षटकांत आठ विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या.
चालू हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच विजय आहे. या आधी मुंबई इंडियन्सनं सलग तीन सामने गमावले होते. तर दिल्ली कॅपिटल्सचा पाच सामन्यांमधला हा चौथा पराभव ठरला.
दिल्ली कॅपिटल्ससाठी ट्रिस्टन स्टब्सनं 25 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या, पण तो संघाला सामना जिंकवून देऊ शकला नाही. स्टब्सनं आपल्या खेळीत सात षटकार आणि तीन चौकार लगावले. सलामीवीर पृथ्वी शॉनंही 66 धावांची खेळी केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं मुंबई इंडियन्ससाठी शानदार गोलंदाजी केली. बुमराहनं 22 धावांत दोन विकेट घेतल्या. जेराल्ड कोएत्झी हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं चार बळी घेतले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सात षटकांत 80 धावांची भागीदारी केली. मात्र, दोन्ही खेळाडू अर्धशतकापासून दूर राहिले. दोघांनाही अक्षर पटेलनं बाद केलं. या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो शून्यावर बाद झाला. एकवेळ मुंबईनं 123 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर हार्दिक पांड्या आणि टीम डेव्हिडनं 58 धावांची भागीदारी करून मुंबईला पडझडीपासून वाचवलं.
येथून डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी शानदार फलंदाजी करत मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. दिल्लीकडून एनरिक नॉर्किया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम डेव्हिडने 21 चेंडूंत चार षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद 45 धावा केल्या. रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. शेफर्डनं आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. डावाच्या शेवटच्या षटकात शेफर्डनं नार्कियाला एकूण 32 धावा ठोकल्या. रोहित शर्मा (49), हार्दिक पांड्या (39) आणि ईशान किशन (42) यांनीही शानदार खेळी खेळली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – कुमार कुशाग्र, यश धूल, फ्रेझर-मॅकगुर्क, सुमित कुमार, प्रवीण दुबे
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेअर्स – आकाश मधवाल, क्वेना मफाका, नमन धीर, नेहाल वढेरा, शम्स मुलानी
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये 49 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे नकोसा रेकॉर्ड
गुजरातविरुद्ध लखनऊनं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी; जाणून घ्या प्लेइंग 11
दे चौका, दे छक्का! आयपीएलमध्ये पुन्हा दिसली कॅरेबियन पॉवर, एकाच षटकात ठोकल्या 32 धावा!