रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजी करत आहे. त्यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 27 चेंडूत 49 धावा ठोकल्या. दिल्लीविरुद्ध ‘हिटमॅन’ त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 43 वं अर्धशतक ठोकू शकला असता, परंतु तो अवघ्या 1 धावेनं हुकला.
आयपीएलमध्ये रोहित शर्मा अर्धशतक करण्याच्या इतक्या जवळ येऊन बाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजपर्यंत रोहित शर्मा आयपीएलमध्ये 49 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज आहे! रोहितनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत तीन वेळा 49 धावांवर विकेट गमावली आहे.
रोहितनं 2010 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध प्रथमच 49 धावांवर विकेट गमावली होती. त्यानंतर 2011 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला पुन्हा एकदा एका धावेनं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. रोहित शर्मानंतर या यादीत डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्युलम, संजू सॅमसन आणि ख्रिस लिन यांचा क्रमांक लागतो. या सर्वांनी त्यांच्या आयपीएल कारकिर्दीत दोन वेळा 49 धावांवर आपली विकेट गमावली आहे.
याशिवाय रोहित शर्मा हा आयपीएलमधील पहिला खेळाडू आहे ज्यानं 40 ते 50 धावांमध्ये तब्बल 20 वेळा आपली विकेट गमावली आहे. त्यानं 20 वेळा 40 धावांचा टप्पा ओलांडला, परंतु त्याला 50 धावा करता आल्या नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित 27 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्यानं 6 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले.
रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत एकही अर्धशतकी खेळी खेळू शकलेला नाही. परंतु त्याचा स्ट्राइक रेट दमदार आहे. चालू हंगामात त्यानं 4 सामन्यात 171 च्या तुफानी स्ट्राईक रेटनं 118 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याची सर्वोच्च धावसंख्या 49 आहे, जी त्यानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात केली. रोहितचा आयपीएल कारकिर्दीतील स्ट्राईक रेट 130 च्या जवळपास असला तरी चालू हंगामात त्यानं रौद्र रूप धारण केल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
दे चौका, दे छक्का! आयपीएलमध्ये पुन्हा दिसली कॅरेबियन पॉवर, एकाच षटकात ठोकल्या 32 धावा!
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माचा भीम पराक्रम! असं करणारा केवळ दुसरा भारतीय
‘तेरे जैसा यार कहां…’, वानखेडेवर पुन्हा भेटले सचिन-सौरव; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल