भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यूएईमध्ये आयपीएल 2021 चे उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएलचे सामने खेळले जातील. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल 2022 चे देखील नियोजन करत आहे. आयपीएलच्या पुढील हंगामापासून 10 संघ सहभागी होतील.
या संदर्भात दिल्लीत नुकतीच बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीत पुढील हंगामाच्या रूपरेषेबद्दल चर्चा झाली. बीसीसीआयने दोन नवीन संघांच्या निविदेसाठी कायदेशीर काम सुरू केले आहे. हे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आहे असे म्हटले जात आहे.
यादरम्यान, आधीपासून संघात असलेल्या खेळाडूंना कायम ठेवण्याबद्दल बहुतेक वादविवाद होत आहेत. असे म्हटले जात आहे की, जर आधीच संघात असलेल्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी दिली गेली तर ते नवीन संघांवर हे अन्यायकारक ठरेल. बीसीसीआय खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने आहे, असे कळते आहे. कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची संख्या अद्याप निश्चित केलेली नाही परंतु, अशी शक्यता आहे की आठ संघ प्रत्येकी तीन-तीन खेळाडू ठेवू शकतात.
सहसा, बीसीसीआय संघांना चार ते पाच खेळाडू कायम ठेवण्याबरोबरच, ‘राईट टू मॅच कार्डचा’ पर्याय देखील देते. राईट टू मॅच कार्डद्वारे, संघ त्यांच्या खेळाडूंना बोलीच्या बरोबरीने पैसे देऊन स्वतःकडे ठेऊन घेतात.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी सामील होण्याचा निर्णय खेळाडूंवर सोडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया कोणत्याही खेळाडूला सामील होण्यापासून रोखणार नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये २० ऑस्ट्रेलियन खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, रिले मेरिडिथ, झी रिचर्डसन, केन रिचर्डसन, मोईसेस ओन्रीक्वेज आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आपण खेळणार नसल्याचे म्हटले आहे.
आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात 31 सामने खेळले जातील. हे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजा येथे खेळले जाणार आहेत. या सामन्यांसाठी सर्व प्रमुख देशांचे खेळाडू उपस्थित राहतील. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजने या स्पर्धेत आपल्या खेळाडूंची उपस्थिती निश्चित केली आहे. आता ऑस्ट्रेलियातून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर, उर्वरित प्रयत्न देखील पूर्ण झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
नॉटिंघम कसोटीत भारत-इंग्लंड संघांनी मारून घेतली आपल्याच पायावर कुऱ्हाड, ‘या’ कारणासाठी झाला मोठा दंड
नॉटिंघम कसोटीतील भेदक गोलंदाजीचा बुमराहला झाला फायदा, नव्या क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानावर