पुणे, 15 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत इराणच्या आमीर मोहंमद झाफर दानिशच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर यू मुंबा संघाने पटना पायरेटस् वर 42-40 अशी चुरशीच्या लढतीत मात करून महत्वपूर्ण विजयाची नोंद केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत इराणच्या आमीर मोहंमद झाफर दानिशने लक्षवेधी कामगिरी करताना 13 गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तत्पूर्वी गुमान सिंगच्या उत्कृष्ट चढाईमुळे यू मुंबाने तिसऱ्याच मिनिटाला 3-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र पटना संघाने सहाव्या मिनिटाला 5-5 अशी बरोबरी साधली. सचिनने एका भेदक चढाईत तीन गडी बाद करताना यू मुंबाचे तीनच खेळाडू मैदनात शिल्लक ठेवले. मात्र विश्वनाथने एकाच चढाईत अंकित व सुधाकरला बाद करुन यु मुंबाला 12 व्या मिनिटाला 10-9 अशी आघाडी मिळवून दिली.
मनजीतने सुपर टॅकल असे करताना पायरेटस् ला 11-13 अशी झुंज मिळवून दिली. तसेच सचिनने उत्कृष्ट बचाव करताना मुंबईची केवळ एक गडी मैदानात अशी अवस्था केली. याच वेळी हैदर अली एकरामी याने भेदक चढाईकरताना मुंबईचे आव्हान कायम राखले. तरीही पायरेटसने मुंबईचे सर्व गडी बाद करताना मध्यंतराला 21-11 अशी आघाडी घेतली. सचिनने उत्तरार्धातही केलेल्या चमकदार कामगिरी मुळे पायरेटस् ने आपली आघाडी 23-19 अशी वाढवली. परंतु आमीर मोहंमदच्या अलाफतून चढायांमुळे 26-25 अशी आघाडी घेतलेल्या यू मुंबाने पायरेटस चे सर्व गडी बाद करताना 27व्या मिनिटाला पहिला लोन चढवला.
सचिनने चढाईत सातत्याने गुण मिळवत पायरेटस् चे आव्हान कायम राखले तरीही 33व्या मिनिटाला दोन्ही संघात 35-35 अशी बरोबरी राहिली. सुरिंदर सिंगने सुपर टॅकल करून यू मुंबाला 35वया मिनिटाला 39-35 असे आघाडीवर नेले. विश्वनाथ आणि आमीर मोहंमदच्या चढायांमुळे अखेरपर्यंत झुंज देणाऱ्या पायरेटस् ला नमवून मुंबई संघाने निसटता विजय मिळवला. या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस वाहिनीवरून करण्यात येत असून डिजने हॉट स्टार संकेत स्थळावरूनही हे सामने विनामूल्य पाहता येत आहेत. (U Mumba’s thrilling win over Patna Pirates)
उद्याचे शनिवारी , 16 डिसेंबर रोजीचे सामने
पुणेरी पलटण विरुध्द बंगाल वॉरियर्स 8वजाता
तेलगू टायटन्स विरुध्द दबंग दिल्ली 9 वाजता
महत्वाच्या बातम्या –
अल्टीमेट खो खो सीझन २ साठी मुंबई खिलाडीच्या खेळाडूंच्या सरावाला सुरुवात
पीवायसी क्रिकेट लीगमध्ये टायफून्स, लायन्स, बुल्स, स्नो लेपर्ड्स, टायगर्स, डॉल्फिन्स,बॉबकॅट्स, स्टॅलियन्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश